"विलिनीकरणाबद्दल भाजपा, मुख्यमंत्र्यांना विचारावं लागेल", राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणावर भुजबळांनी काय सांगितले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 20:01 IST2026-02-02T19:57:25+5:302026-02-02T20:01:11+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाचा मुद्दा अजित पवार यांच्या निधनानंतर प्रामुख्याने केंद्रस्थानी आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते विलिनीकरणाची चर्चा फेटाळून लावत आहेत. त्यातच आता भुजबळांनी एक विधान केले.

"विलिनीकरणाबद्दल भाजपा, मुख्यमंत्र्यांना विचारावं लागेल", राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणावर भुजबळांनी काय सांगितले?
Chhagan Bhujbal on NCP Merger Rumors Maharashtra: अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्राचे राजकारण राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन पक्षाच्या विलिनीकरणाच्या मुद्द्याने ढवळून निघाले आहे. शरद पवारांच्या बाजूचे नेते विलिनीकरणाची चर्चा झाली होती, असे म्हणत आहेत. तर अजित पवारांच्या बाजूकडील नेते विलिनीकरणाच्या चर्चेबद्दल माहिती नाही, असा दावा करत आहेत. त्यातच आता छगन भुजबळ यांनी वेगळी भूमिका मांडली आहे.
अजित पवारांचे निधन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्यांनी दावा केला की, दोन्ही पक्षाचे विलिनीकरण व्हावे, अशी अजित पवारांची इच्छा होती. पण, सुनील तटकरे आणि त्यांच्या सहकारी नेत्यांकडून अशी चर्चा झाली नसल्याचे दावे केले जात आहे. याबद्दलच कॅबिनेट मंत्री भुजबळ यांनीही भूमिका मांडली आहे.
छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. भुजबळ यांनी सांगितले की, "दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत अशी अनेकांची इच्छा आहे. ठाकरे एकत्र आले मग पवारही यावेत. परंतू अशा काही चर्चा झाल्या की नाही, याची कल्पना नाही. मुख्यमंत्र्यांनीही सांगितलं की, त्यांच्याशी अजित पवार यासंदर्भात काहीही सांगितलं नव्हतं. तसंच आम्हालाही याची कल्पना नाही. हे सर्व करायचं म्हणजे भाजपाबरोबर राहून करायचं आहे, त्यामुळे त्यांना विचारलं पाहिजे.
'भाजपा, मुख्यमंत्र्यांना विचारावं लागेल'
भुजबळ पुढे म्हणाले की, "राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबद्दल भाजपाच्या ज्येष्ठ मंडळींनाही विचारावं लागेल. दोन्ही पक्षाच्या विलिनीकरणाबद्दल काय बोलणं झालं? कोणाबरोबर बोलणं झालं? हे माझ्यासहित कोणालाही माहिती नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना विचारावं लागेल. कारण आम्ही त्यांच्याबरोबर सरकारमध्ये आहोत. सरकारमधून बाहेर पडायचं असेल, तर भाग वेगळा आहे", अशी भूमिका भुजबळ यांनी मांडली.
सुनेत्रा पवारांनी होकार दिल्यानंतरच उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी
छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री पदाचा घाईत शपथविधी केल्याच्या मुद्द्यावरून होत असलेल्या टीकेलाही उत्तर दिले. भुजबळ म्हणाले, "कोणाचा स्वार्थ आहे आणि कोणाचा नाही, हे जनता ठरवेल. सुनेत्राताईंचा शपथविधी झाला, अनेकांनी टीकेचा सूर लावले. पण, सुनेत्रा पवारांना विचारूनच हा कार्यक्रम झाला. त्यांच्याशिवाय कोणतेही नाव चर्चेत नव्हते. सुनेत्रा पवारांनी संमती दिली, विधानमंडळ आणि आमदारांची परवानगी होती. मुख्यमंत्र्यांनाही याबद्दल राज्यपालांना सांगितले होते. हे दोन ते तीन घटक महत्त्वाचे आहेत. या सर्वांनी एकसुराने होकार दिला, त्यांनतर शपथविधीचा कार्यक्रम झाला", असे भूजबळ यांनी सांगितले.