स्वतःला संपवू नका गं… तुम्हाला त्रास देणाऱ्या नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे - चित्रा वाघ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 14:26 IST2025-10-24T14:24:35+5:302025-10-24T14:26:00+5:30
BJP Chitra Wagh : चित्रा वाघ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

स्वतःला संपवू नका गं… तुम्हाला त्रास देणाऱ्या नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे - चित्रा वाघ
साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे फलटण परिसरात तसेच संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली. उपजिल्हा रुग्णालयातील कार्यरत असलेली महिला डॉक्टर काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागाच्या एका वादामध्ये अडकली होती. पोलिसांशी झालेल्या वादानंतर अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली होती. या चौकशीमुळे महिला डॉक्टर मोठ्या मानसिक तणावाखाली होती. त्यानंतर तिने टोकाचं पाऊल उचललं.
भाजपाच्या आमदार चित्रा वाघ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "डॉ. संपदा मुंडे यांचा आत्महत्येचा प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि मनाला चटका लावणारी घटना आहे. यासंदर्भात साताऱ्याचे एसपी दोषीजी यांच्याशी माझे बोलणे झाले. याप्रकरणासंबंधी FIR नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली असून जे आरोपी आहे त्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली. एक आरोपी साताऱ्याच्या बाहेर असून त्याला ताब्यात घेण्यासाठी विशेष पथक पाठवण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल."
डॉ. संपदा मुंडे यांचा आत्महत्येचा प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि मनाला चटका लावणारी घटना आहे.
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 24, 2025
यासंदर्भात साताऱ्याचे एसपी दोषी जी यांच्याशी माझे बोलणे झाले. याप्रकरणासंबंधी FIR नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली असून जे आरोपी आहे त्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली. एक आरोपी… pic.twitter.com/9m2ILQS4MN
"या घटनांमध्ये मुलींना जेव्हा त्रास होत असतो तेव्हा त्यांना मदत करणे जास्त समाधानकारक असतं… म्हणूनच या घटनेच्या पार्श्वभूमीवर मला माझ्या सगळ्या बहिणींना मुलींना सांगायचं आहे की, स्वतःला संपवू नका गं … तुम्हाला त्रास देणाऱ्या नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे. शासन तुमच्या सोबत आहे. देवाभाऊंनी तुमच्या सुरक्षेसाठी ११२ ही हेल्पलाईन सुरू केली आहे. त्यामुळे स्वतःला संपण्यापेक्षा जे आपल्याला त्रास देतात त्या नराधमांना शिक्षा व्हायला पाहिजे यासाठी आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत" असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
महिला डॉक्टरने यापूर्वीच आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देऊन 'माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन' असा स्पष्ट इशारा दिला होता. मात्र या गंभीर इशाऱ्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. फलटणमधील एका हॉटेलमध्ये महिला डॉक्टरने आपले आयुष्य संपवले. रात्री उशिरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला. प्राथमिक तपासानुसार ही आत्महत्या असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर आता उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं आहे.