५ ते १२ नोव्हेंबरदरम्यान राज्यात पक्षी सप्ताह; पक्ष्यांचे महत्त्व, अधिवासाची मिळणार माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 02:59 AM2020-10-28T02:59:04+5:302020-10-28T06:59:56+5:30

Maharashtra News : राज्य वन्यजीव मंडळाच्या १५ व्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार, दरवर्षी या कालावधीत पक्षी सप्ताह साजरा करण्याची बाब विचाराधीन होती. आता  महाराष्ट्र राज्य पक्षी सप्ताह साजरे करणारे भारतातील पहिले राज्य आहे. 

Bird Week in the Maharashtra from 5 to 12 November; Information on the importance of birds, habitat | ५ ते १२ नोव्हेंबरदरम्यान राज्यात पक्षी सप्ताह; पक्ष्यांचे महत्त्व, अधिवासाची मिळणार माहिती

५ ते १२ नोव्हेंबरदरम्यान राज्यात पक्षी सप्ताह; पक्ष्यांचे महत्त्व, अधिवासाची मिळणार माहिती

googlenewsNext

मुंबई : पद्मभूषण डॉ. सलीम अली यांच्या जयंतीचे औचित्य साधत आणि साहित्यिक, सेवानिवृत्त वनाधिकारी मारुती चितमपल्ली यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत ५ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत दरवर्षी पक्षी सप्ताह साजरा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. राज्य वन्यजीव मंडळाच्या १५ व्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार, दरवर्षी या कालावधीत पक्षी  सप्ताह साजरा करण्याची बाब विचाराधीन होती. आता  महाराष्ट्र राज्य पक्षी सप्ताह साजरे करणारे भारतातील पहिले राज्य आहे. 

महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाच्या १५ व्या बैठकीत मंडळाचे सदस्य यादव तरटे पाटील यांनी हा विषय ठेवून पाठपुरावा केला होता. शासन निर्णय निर्गमित झाला असून, सर्व पक्षिमित्रांचे अभिनंदन केले जात आहे. पक्षी सप्ताहामध्ये पक्ष्यांचे निसर्गातील महत्त्व, संकटग्रस्त पक्षी आणि त्यांचे अधिवास, स्थलांतर, अधिवासाचे संरक्षण, पक्षी संरक्षण व संवर्धन कायद्याविषयी माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. सर्वसामान्य नागरिकांसाठी पक्षी छायाचित्र प्रदर्शन, पक्षी  छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात.  शालेय विद्यार्थ्यांकरिता चित्रकला, निबंध स्पर्धा, छायाचित्र प्रदर्शनी, कार्यशाळा, माहितीपटाचे आयोजन करण्यात यावे. स्थलांतरित पक्ष्यांचे अधिवास, पाणथळी, तलाव, धरण, जंगल येथे कार्यक्रम आयोजित करावे. पक्षी गणना, अधिवास स्वच्छता, पक्षी अभ्यास असे  कार्यक्रम आयोजित करण्यात  यावेत. जलसंपदा, कृषी, पोलीस विभाग यांच्या शासकीय यंत्रणांना यात सहभागी करून घ्यावे, अशा सूचना यानिमित्ताने देण्यात आल्या  आहेत. 

जन्मदिन आणि जयंतीचे औचित्य साधत पक्षी सप्ताह
नोव्हेंबर हा महिना पक्षी स्थलांतरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिन ५ नोव्हेंबर असून, सलीम अली यांची जयंती १२ नोव्हेंबर रोजी असते. जन्मदिन आणि जयंतीचे औचित्य साधत ५ ते १२ नोव्हेंबर हा आठवडा पक्षी सप्ताह साजरा करण्यात यावा, अशी मागणी पक्षीप्रेमी संस्था आणि राज्य वन्यजीव मंडळातील सदस्यांकडून होत होती. या मागणीचा विचार करत हा निर्णय घेण्यात आला आहे.
सलीम अली यांच्या द बुक ऑफ इंडियन बर्ड्सच्या आधारावर अनेक पक्षीमित्र वाटचाल करत आहेत. मारुती चितमपल्ली यांचे वन्यजीवविषयक साहित्य वाचून महाराष्ट्रातील अनेक जण पक्षी व वन्यजीव अभ्यास व संवर्धनाकडे वळले आहेत. योगायोगाने या दोघांचा जन्मदिवस नोव्हेंबर महिन्यात येतो.
 

Web Title: Bird Week in the Maharashtra from 5 to 12 November; Information on the importance of birds, habitat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.