सत्य आणि लोकांचा विश्वास हीच पत्रकारितेची खरी शक्ती: राजेंद्र दर्डा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 10:05 IST2026-04-19T10:03:28+5:302026-04-19T10:05:16+5:30
सत्यासाठी उभे राहण्याचा, मूल्याधिष्ठित पत्रकारितेचा आणि पारदर्शी आरसा बनण्याचा संकल्प करून लोकांचा विश्वास कायम राखला पाहिजे. तीच पत्रकारितेची खरी शक्ती आहे. समाजाला केवळ माहिती नको, तर विश्वासार्ह, पडताळलेली आणि जबाबदार बातमी हवी आहे, असे प्रतिपादन ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी शनिवारी येथे केले.

सत्य आणि लोकांचा विश्वास हीच पत्रकारितेची खरी शक्ती: राजेंद्र दर्डा
लोकमत न्यूज नेटवर्क
उदगीर (जि. लातूर) : सत्यासाठी उभे राहण्याचा, मूल्याधिष्ठित पत्रकारितेचा आणि पारदर्शी आरसा बनण्याचा संकल्प करून लोकांचा विश्वास कायम राखला पाहिजे. तीच पत्रकारितेची खरी शक्ती आहे. समाजाला केवळ माहिती नको, तर विश्वासार्ह, पडताळलेली आणि जबाबदार बातमी हवी आहे, असे प्रतिपादन ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी शनिवारी येथे केले.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या ४४व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री आ. संजय बनसोडे, परिषदेचे मुख्य संयोजक एस. एम. देशमुख, मिलिंद आष्टीवकर, नगराध्यक्षा स्वाती हुडे उपस्थित होते. राजेंद्र दर्डा म्हणाले की, पत्रकार म्हणून बातमी वेगाने दिलीच पाहिजे. मात्र, प्राधान्य वेगाला की सत्याला हे लक्षात ठेवले पाहिजे. सोशल मीडिया ही एक मोठी संधी आहे. त्याचवेळी अनेक वेळा ते मोठे आव्हान ठरत आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेचे आपल्यासमोर आव्हान आहे, असे स्पष्ट करीत राजेंद्र दर्डा म्हणाले, सद्य:स्थितीत ए-आय बातमी तयार करणे, डेटा विश्लेषण, फॅक्ट चेकिंग या सगळ्यांमध्ये उपयोगी ठरत आहे. ते साधन आहे मात्र, पर्याय नाही. मानवी संवेदना, नैतिकता आणि सामाजिक जबाबदारीची जागा कोणतेही तंत्रज्ञान घेऊ शकत नाही. त्यामुळे तंत्रज्ञानाला स्वीकारून सत्याच्याच मार्गाने पुढे जाण्याची जबाबदारी पत्रकारांची असेल. अ. भा. मराठी पत्रकार परिषदेने मांडलेल्या निवृत्तिवेतन, पत्रकारांच्या आरोग्यविषयक प्रश्नांची दखल शासनाने घ्यावी, असे आवाहनही दर्डा यांनी केले. अनिता येलमट्टे, रसूल पठाण यांनी सूत्रसंचालन केले. मंचावर जिल्हाधिकारी डॉ. भारत भास्टेवाड, पोलिस अधीक्षक अमोल तांबे, प्राचार्य डॉ. सुधीर जगताप, परिषदेचे किरण नाईक, चंद्रशेखर जाधव, हरीश पटणे, शरद पाबळे, प्रा. सुरेश नाईकवाडे उपस्थित होते.
‘लोकमत’ने जोपासली सामाजिक बांधिलकी
भाषा, गुणवत्ता, आशय, सामाजिक बांधिलकी, तंत्रज्ञान, व्यावसायिक कौशल्य यासोबतच मेहनती एकनिष्ठ सहकाऱ्यांच्या भरवशावरच ‘लोकमत’ने एवढा मोठा पल्ला गाठला असल्याचे सांगत राजेंद्र दर्डा यांनी सामाजिक बांधिलकी, सौहार्द जपल्याची उदाहरणे दिली. प्रारंभी परिषदेचे विश्वस्त एस.एम. देशमुख म्हणाले, राज्य सरकारने पत्रकार संरक्षण कायदा मंजूर केला. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही. ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन सुलभपणे मिळत नाही. अधिस्वीकृतीचे नियम किचकट आहेत, असे सांगत शासनाचे लक्ष वेधले.
पत्रकारांचे प्रश्न मांडू : शिवेंद्रसिंहराजे भोसले
पत्रकारांनी अधिवेशनात मांडलेल्या प्रश्नांचा पाठपुरावा करू, अशी ग्वाही देत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, पत्रकारितेमुळे सामान्य प्रश्नाला न्याय मिळतो. लातूरमध्ये पत्रकारांच्या आंदोलनामुळे जिल्हा रुग्णालयाच्या उभारणीला गती मिळाली. उदगीर जिल्हा निर्मितीचा प्रश्नही उचलून धरला आहे. शासन त्याबाबत योग्य निर्णय घेईल. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, मुद्रित माध्यमांचे महत्त्व कधीही कमी होणार नाही. लोकांचा वर्तमानपत्रावरील विश्वास अढळ आहे. प्रारंभी माजी मंत्री आ. संजय बनसोडे म्हणाले, पत्रकार भवनासाठी चार कोटींचा निधी उपलब्ध केला आहे. आता जिल्हा निर्मितीसाठी पाठपुरावा सुरू आहे.