पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन; लातूर जिल्ह्यात १९० खटले !
By राजकुमार जोंधळे | Updated: April 18, 2026 21:52 IST2026-04-18T21:51:19+5:302026-04-18T21:52:31+5:30
२७ ठिकाणी नाकाबंदी : दाेन दिवस राबविली माेहीम...

पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन; लातूर जिल्ह्यात १९० खटले !
राजकुमार जाेंधळे
लातूर : जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी लातूर पोलिसांनी १६ आणि १७ एप्रिल जिल्ह्यात २७ ठिकाणी नाकाबंदी केली. शिवाय, ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवले. दोन दिवसांच्या माेहिमेमध्ये रात्री ११ ते पहाटे ५ या कालावधीत माेठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पाेलिसांनी अत्यावश्यक सेवा वगळळ्या हाेत्या. या ‘कोम्बिंग ऑपरेशन’साठी जवळपास ६० टक्के मनुष्यबळ रस्त्यावर उतरवण्यात आले होते. ऑपरेशन सुरू होण्यापूर्वी सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी आपापल्या पथकांना सविस्तर सूचना दिल्या. चोरी, घरफोडीची शक्यता लक्षात घेत दुचाकी, चारचाकी वाहनांद्वारे गस्त वाढवण्यात आली हाेती. लातूर जिल्ह्यातील सर्व महत्त्वाचे रस्ते, हॉटेल, लॉज, धाबे, बसस्थानके, रेल्वेस्थानके, पेट्रोल पंप आणि बँका आदी संवेदनशील ठिकाणांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार, तुरुंगातून सुटलेले आरोपी आणि हिस्ट्रीशीटरची विशेष चौकशी करण्यात आली. फरार आणि वाॅन्टेड आरोपींना पकडण्यासाठी शोधमोहीम राबवण्यात आली.
‘कोम्बिंग ऑपरेशन’मध्ये
करण्यात आली कारवाई...
दोन दिवसांच्या ‘कोम्बिंग ऑपरेशन’मध्ये लातूर जिल्ह्यातील २३ पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत २७ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. यात ३९ पाेलिस अधिकारी, १४२ पाेलिस अंमलदारांचा सहभाग हाेता. नाकाबंदीमध्ये २४९ वाहनांची तपासणी केली. फरार, वाॅन्टेड असलेल्या २५ जणांना ताब्यात घेतले. आर्म ॲक्टनुसार १ खटला, कलम १२२ अन्वये १ खटला दाखल केला. ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’प्रकरणी १० जणांवर गुन्हे दाखल केले. तर मोटार वाहन कायद्यांनुसार १९० खटले दाखल करण्यात आले आहेत.