लातूरमध्ये आयपीएल सट्ट्यावर मोठी कारवाई; चालत्या कारमध्ये सट्टा खेळवणारे चौघे अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 17:30 IST2026-04-15T17:26:54+5:302026-04-15T17:30:03+5:30
या कारवाईत सुमारे १३ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लातूरमध्ये आयपीएल सट्ट्यावर मोठी कारवाई; चालत्या कारमध्ये सट्टा खेळवणारे चौघे अटकेत
लातूर : जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेला आणखी एक यश मिळाले असून, आयपीएल क्रिकेट सट्टाप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे १३ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या पथकाने १३ एप्रिल रोजी आंबेजोगाई रोड परिसरात छापा टाकला. यावेळी एका चारचाकी वाहनामध्ये बसून आयपीएल सामन्यांवर सट्टा चालविणाऱ्या चौघांना रंगेहाथ पकडण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सचिन प्रकाश वलसे (वय ४७), किरणकुमार अर्जुन केंद्रे (वय ४१), गंगाधर रामराव घाडगे (वय ५१) आणि मनीष श्रीकांत पंचाक्षरी (वय ३७) यांचा समावेश आहे. प्राथमिक चौकशीत आरोपी मोबाइल फोन व ऑनलाइन माध्यमांच्या साहाय्याने ग्राहकांकडून पैशांची देवाणघेवाण करून सट्टा व्यवहार करत असल्याचे निष्पन्न झाले.
या कारवाईदरम्यान आरोपींकडून विविध कंपन्यांचे मोबाइल फोन, एक लॅपटॉप, रोख रक्कम, सट्टा व्यवहाराच्या नोंदी तसेच एक क्रेटा चारचाकी वाहन (क्र. एमएच २६ बीटी ९९०९) असा एकूण १३ लाख ७३ हजार ९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल
तपासात आरोपी व यांच्यातील आयपीएल सामन्यावर सट्टा घेत असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी आरोपींविरूद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास शिवाजीनगर पोलिस करत आहेत. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.