लातूरमध्ये भरवस्तीत रक्ताचा सडा! भंगार गोळा करणाऱ्या वृद्धाची डोक्यात फरशी घालून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 13:00 IST2026-04-09T12:59:20+5:302026-04-09T13:00:17+5:30
लातुरात किरकोळ वादातून वृद्धाचा थरारक अंत; संशयित आरोपीची ओळख पटली, पोलीस मागावर.

लातूरमध्ये भरवस्तीत रक्ताचा सडा! भंगार गोळा करणाऱ्या वृद्धाची डोक्यात फरशी घालून हत्या
लातूर: शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कावळेनगर परिसरात बुधवारी सकाळी एका ६५ वर्षीय वृद्धाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. विठ्ठल सोपान ससाणे (मूळ रा. मुगाव, ता. चाकूर) असे मृताचे नाव असून, ते शहरात भंगार गोळा करून आपला उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या डोक्यात लाकडी दांडा आणि फरशीच्या तुकड्याने जबर प्रहार करून त्यांची हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीची ओळख पटवली असून, त्याला पकडण्यासाठी विशेष पथके जिल्ह्याबाहेर रवाना झाली आहेत.
अज्ञात कारणावरून वाद अन् जीवघेणा हल्ला
प्राथमिक माहितीनुसार, विठ्ठल ससाणे आणि आरोपीमध्ये बुधवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात कारणावरून वाद झाला असावा. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन आरोपीने ससाणे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. डोक्यावर झालेल्या गंभीर वारामुळे ससाणे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अमोल तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
आरोपीची ओळख पटली; तपासाला गती
शिवाजीनगर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीदारांच्या मदतीने संशयित आरोपीची ओळख पटविण्यात यश मिळविले आहे. "आरोपीच्या अटकेसाठी गुन्हे शाखा आणि पोलीस ठाण्याची पथके रवाना करण्यात आली असून, लवकरच त्याला गजाआड केले जाईल," असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. ही हत्या जुन्या भांडणातून झाली की ऐनवेळी उद्भवलेल्या वादातून, याचा खुलासा आरोपीच्या अटकेनंतरच होणार आहे.