शिरोली : गेल्या पंधरा दिवसापासून उघडीप घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. गेली दोन दिवस संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे नदी, नाले दुभडी भरुन वाहू लागले आहेत. यातच कोल्हापूर-सांगली मार्गावर शिरोली सांगली फाटा मार्बल लाईन ते हॉटेल शिवतरा या ५०० मीटर अंतरावर ओढ्याचे पाणी आल्याने या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे.शिरोली सांगली फाटा मार्बल लाईन ते शिवतारा या ५०० मिटर अंतरावर सुमारे १ फुटा पेक्षा जास्त पाणी आहे. हा मार्ग शिरोली पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद केला आहे. त्यामुळे दुपारी चार वाजले पासून या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे. एकेरी वाहतूक सुरू असल्याने वाहनांच्या रांगा लांबच लांब लागल्या आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी शिरोली पोलीस याठिकाणी तैनात आहेत.धरण पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. परिणामी पंचगंगेची पाणी पातळी सायंकाळी 6 वाजेपर्यंत 34 फूट 1 इंच इतकी झाली आहे. यामुळे पंचगंगा नदीवरील 63 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास पूरपरिस्थिती उद्धभवण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर: शिरोली-सांगली फाट्यानजीक आलं पाणी, एकेरी वाहतूक सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 19:11 IST