ठाण्यातील फरार माजी सहायक आयुक्तांना कोल्हापुरात अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 12:44 IST2026-05-08T12:43:33+5:302026-05-08T12:44:37+5:30
नरंदे येथील एका हॉटेलमध्ये ते लपून बसल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर छापा मारून त्यांना ताब्यात घेण्यात आले.

ठाण्यातील फरार माजी सहायक आयुक्तांना कोल्हापुरात अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे/कोल्हापूर : लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार असलेले ठाणे महापालिकेचे माजी सहायक आयुक्त महेश आहेर यांना कोल्हापूर पोलिसांनी गुरुवारी पहाटे नरंदे (ता. हातकणंगले) येथून ताब्यात घेतले. आहेर यांचा शोध घेण्यासाठी ठाणे गुन्हे शाखेने विविध ठिकाणी पथके रवाना केली होती.
नरंदे येथील एका हॉटेलमध्ये ते लपून बसल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर छापा मारून त्यांना ताब्यात घेण्यात आले. शुक्रवारी आहेर यांना ठाणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणात आणखी धक्कादायक बाब म्हणजे नाशिकमधील भोंदू 'अशोक खरात याचेही नाव समोर आले आहे. तक्रारदार महिलेला नाशिक येथे नेऊन अघोरी प्रकार करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
महिलेने पोलिसात केली होती तक्रार
ठाणे पालिकेतील डेटा एन्ट्री ऑपरेटर महिलेने आहेर यांच्याविरोधात कासारवडवली पोलिस ठाण्यांत २० एप्रिलला तक्रार दिली होती, त्यात २०२० ते २०२३ या कालावधीत आहेर यांनी पदाचा गैरवापर करून मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हिरानंदानी इस्टेटमधील फ्लॅटवर बोलावून शीतपेयातून गुंगीचे औषध देत अत्याचार केल्याचा तसेच वारंवार शारीरिक संबंधांसाठी दबाव टाकल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.