कोल्हापूर जिल्ह्यात तीन मंत्री, ३ खासदार, १२ आमदारांसह व्हीआयपी ताफा; त्यांच्या इंधनावर होतो महिन्याला ४० लाखांवर चुराडा

By उद्धव गोडसे | Updated: May 13, 2026 16:48 IST2026-05-13T16:45:25+5:302026-05-13T16:48:56+5:30

एका वाहनाचा होतो तीनशे किलोमीटरचा प्रवास : अडीच वर्षांत ४,९०० वेळा पुरवली एस्कॉर्ट सेवा : १६८ झेड प्लस दौरे

Over Rs 40 lakhs spent on fuel during minister's visit to Kolhapur district | कोल्हापूर जिल्ह्यात तीन मंत्री, ३ खासदार, १२ आमदारांसह व्हीआयपी ताफा; त्यांच्या इंधनावर होतो महिन्याला ४० लाखांवर चुराडा

Artificial intelligence

उद्धव गोडसे

कोल्हापूर : जिल्ह्यातील तीन मंत्र्यांच्या लवाजम्यात प्रत्येकी किमान १० वाहनांचा समावेश असतो. एका दिवसाच्या दौऱ्यात इंधनावर किमान एक लाख रुपयांचा चुराडा होत असल्याचे चित्र आहे. तिन्ही मंत्र्यांच्या दौऱ्यांसाठी दरमहा १५ लाखांवर खर्च होतो. याशिवाय १२ आमदार आणि तीन खासदारांसह बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी जिल्हा प्रशासनाकडून वाहने, इंधन पुरवले जाते. यावरून लोकप्रतिनिधींच्या दौऱ्यांत इंधनावर होणाऱ्या खर्चाचा अंदाज येऊ शकतो.

इराण - अमेरिका, इस्राइल युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. येणाऱ्या काळात परिस्थिती आणखी चिघळण्याचा धोका असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधन बचत करण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मंत्री, आमदार, खासदार आणि बाहेरून येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यांवरील खर्चाचा अंदाज काढला असता डोळे विस्फारणारे आकडे समोर आले आहेत.

पंधरा दिवस दौरा, प्रत्येकी दहा वाहनांचा समावेश

जिल्ह्यात पालकमंत्री प्रकाश आबिटकर, हसन मुश्रीफ हे कॅबिनेट मंत्री आहेत, तर राजेश क्षीरसागर यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा आहे. मुश्रीफ व आबिटकर यांचा महिन्यातून किमान १५ दिवस जिल्ह्यात दौरा असतो. त्यांच्या दौऱ्यात प्रत्येकी दहा वाहनांचा समावेश असतो. एक वाहन दिवसात किमान ३०० किलोमीटर अंतर प्रवास करते. दहा वाहनांचा प्रवास किमान ३ हजार किलोमीटर होतो. तिन्ही मंत्र्यांचा विचार करता ९ हजार किलोमीटर प्रवास होतो. त्यासाठी ९० हजार ते एक लाख रुपये खर्च होतात. यात काही कार्यकर्ते आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनांचाही समावेश असतो.

दौऱ्यात अशी असते वाहनांची व्यवस्था

  • झेड प्लस सुरक्षा असल्यास कॅनवॉयमध्ये किमान १२ वाहने असतात.
  • झेड सुरक्षेसाठी सहा वाहने, वाय प्लससाठी चार वाहने
  • एक्स सुरक्षेसाठी किमान तीन वाहने पुरवली जातात.
  • मंत्र्यांच्या नियमित दौऱ्यांसाठी त्यांच्या वैयक्तिक वाहनाशिवाय पायलट कार, एस्कॉर्ट आणि सुरक्षेसाठी डीव्ही कार पुरवली जाते.
  • पायलट आणि एस्कॉर्ट कार पोलिसांकडून, तर सुरक्षेची डीव्ही कार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुरवली जाते. आरोग्य विभागाकडून रुग्णवाहिका आणि अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचा बंब पुरवला जातो.
  • जिल्ह्यात गेल्या अडीच वर्षांत ४ हजार ९०० वेळा पोलिसांनी एस्कॉर्ट पुरवले, तर १६८ झेड प्लस दौऱ्यांसाठी वाहने पुरवली.
     

दौऱ्यांचा अतिरिक्त ताण

करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून अतिमहत्त्वाच्या व्यक्ती कोल्हापुरात येतात. मंत्र्यांचे दौरे नियमित सुरूच असतात. विमानतळामुळे कोकण, दक्षिण महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील मंत्र्यांचे कोल्हापुरातील दौरे वाढले आहेत. जिल्ह्यातून पुढे जाणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठीही सुरक्षा वाहने पुरवली जातात. याचा पोलिसांवर प्रचंड ताण वाढला आहे.

पंतप्रधान मोदींचे 'ते' ७ मंत्र

१. सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर करा.
२. शक्य असल्यास 'कार - पुलिंग'ला प्राधान्य द्या.
३. इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराकडे वळा.
४. अनावश्यक प्रवासाला कात्री लावा.
५. ऑनलाइन मिटिंग आणि वर्क फ्रॉम होमवर भर द्या.
६. एकाच मार्गावर एकत्रित प्रवास करा
७. अनावश्यक असल्यास प्रवास टाळा

काय आहे जनभावना?

पंतप्रधानांनी दिलेला बचतीचा संदेश मंत्र्यांनी स्वतःपासून सुरू करावा. मंत्र्यांनी आपल्या ताफ्यातील गाड्यांची संख्या ५० टक्क्यांनी कमी केली, तर इंधनाची मोठी बचत होईल. तुम्ही स्वत: कोणत्याच गोष्टीवर नियंत्रण ठेवणार नाही आणि सगळे जनतेनेच करावे, अशी अपेक्षा करणे योग्य नाही. नुसते इंधनच का. मंत्र्यांच्या भत्त्यांपासून सगळ्यालाच कात्री लावा, अशीही जनभावना आहे.

Web Title : कोल्हापुर में वीआईपी काफिले ईंधन पर ₹40 लाख मासिक बर्बाद करते हैं।

Web Summary : कोल्हापुर के मंत्री, विधायक और सांसद ईंधन पर ₹40 लाख मासिक खर्च करते हैं। मंत्रियों के काफिले में दस वाहन शामिल हैं, जिनकी लागत ₹1 लाख प्रति दिन है। पीएम मोदी ने ईंधन संरक्षण का आग्रह किया।

Web Title : Kolhapur VIP convoys waste ₹40 lakh monthly on fuel.

Web Summary : Kolhapur ministers, MLAs, and MPs burn ₹40 lakh monthly on fuel. Ministers' convoys include ten vehicles, costing ₹1 lakh per day. PM Modi urges fuel conservation.