कोल्हापुरात सावकाराकडून महिलेचा ३ वर्षे छळ; ३०० अश्लील व्हिडीओ बनवून जावयाला दाखवले अन्..
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 12:29 IST2026-04-23T12:19:16+5:302026-04-23T12:29:26+5:30
कोल्हापूरात सावकाराने एका महिलेचा छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

कोल्हापुरात सावकाराकडून महिलेचा ३ वर्षे छळ; ३०० अश्लील व्हिडीओ बनवून जावयाला दाखवले अन्..
Kolhapur Crime: राज्यात अशोक खरात, परतवाडा प्रकरणं ताजी असतानाच, कोल्हापुरातून अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. दोन लाख रुपयांच्या कर्जाच्या बदल्यात एका खासगी सावकाराने महिलेचे शारीरिक शोषण केले. सावकाराने एवढ्यावरच न थांबता पीडितेचे ३०० अश्लील व्हिडीओ बनवून तिला तीन वर्षे ब्लॅकमेल केले. या प्रकरणी गांधीनगर पोलिसांनी सावकार अमित कृष्णात सावंत याला बेड्या ठोकल्या आहेत.
१० टक्के व्याजाने दिले दोन लाख ठरले कारण
पीडित महिला एका सामाजिक संस्थेत आरोग्य सल्लागार म्हणून काम करते. २०२३ मध्ये गहाण ठेवलेले घर सोडवण्यासाठी तिला पैशांची गरज होती. त्यावेळी तिच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या अमित सावंतकडून तिने १० टक्के दराने २ लाख रुपये व्याजाने घेतले. महिलेचे व्याजाचे हप्ते थकले आणि इथूनच अमित सावंतचा खरा क्रूर चेहरा समोर आला.
३ वर्षे छळ, ३०० व्हिडीओ आणि हॉटेल-गाडीत अत्याचार
कर्ज वसुलीच्या नावाखाली अमितने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. नकार दिल्यास व्याजाचे पैसे तातडीने दे अन्यथा परिणाम भोगण्याची धमकी दिली. तपासातून समोर आले की, २०२३ पासून एप्रिल २०२६ पर्यंत अत्याचार सुरू होते. आरोपीने महिलेला विविध लॉजवर आणि स्वतःच्या मित्राच्या कारमध्ये नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला. या काळात त्याने पीडितेचे नग्न फोटो आणि सुमारे ३०० अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड केले. हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि कुटुंबीयांना दाखवण्याची धमकी देऊन तो छळ करत होता.
जावयाला सासूचे अश्लील व्हिडीओ दाखवून मारहाण
पीडितेने नोव्हेंबर २०२५ पर्यंत २ लाख १० हजार रुपये परत केले होते, तरीही २५ हजार बाकी आहेत असे सांगून तो तिला त्रास देत राहिला. त्याने पीडितेच्या जावयाला एका हॉटेलमध्ये बोलावून घेतले आणि तिथे त्याला त्याच्या सासूचे अश्लील व्हिडीओ दाखवले. इतकेच नाही, तर जावयाला बेदम मारहाण करत सासूकडून पैसे वसूल करून द्यायला सांगितले.
पोलिसांची धडक कारवाई
अखेर पीडितेने गांधीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून अमित सावंतवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार आणि महाराष्ट्र सावकारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.