नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 16:54 IST2026-04-23T16:53:20+5:302026-04-23T16:54:00+5:30
इटावामध्ये लग्नाच्या मंडपात मोठा राडा. मैत्रिणीच्या सल्ल्यानंतर नवरीने मोडले लग्न.

AI Generated Image
लग्नाचा मंडप, फुलांची सजावट, पाहुण्यांची उपस्थिती आणि हातात वरमाला घेऊन स्टेजवर उभी असलेली नवरी... हे सगळं एखाद्या आनंदी चित्रपटासारखं सुरू होतं. मात्र, काही क्षणांतच असं काही घडलं की, आनंदाचं रूपांतर गोंधळात आणि अखेर लग्नाच्या मोडण्यात झालं. उत्तर प्रदेशातील इटावामध्ये घडलेल्या या विचित्र घटनेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
स्टेजवर नेमकं काय घडलं?
भरथना भागातील नगला तालपार गावातील संजीव यांची कन्या आणि नगला कोरी येथील युवकाचे लग्न २० एप्रिल रोजी ठरले होते. वरात धुमधडाक्यात गेस्ट हाऊसवर पोहोचली. सर्व काही ठरल्याप्रमाणे सुरू होते. नवरी आणि नवरदेव स्टेजवर आले आणि वरमाला घालण्याची वेळ आली. याच वेळी नवरीची नोएडावरून आलेली एक मैत्रीण जवळ आली आणि तिने नवरीच्या कानात काहीतरी कुजबुज केली. मैत्रिणीचे ते शब्द ऐकताच नवरीचे हावभाव अचानक बदलले आणि तिने सर्वांसमोरच लग्नाला स्पष्ट नकार दिला. हातातली वरमाला तिथेच टाकून ती स्टेजवरून खाली उतरली.
परिवाराच्या विनवण्या निष्फळ
लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांना आणि वधू-वरांच्या कुटुंबियांना काहीच कळेना. नवरदेव आणि नवरीच्या वडिलांनी तिला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला, पण नवरी कोणाचेही ऐकण्यास तयार नव्हती. शेवटी, अत्यंत अपमानास्पद स्थितीत नवरदेवाला वरात रिकाम्या हाताने परत न्यावी लागली.
पोलीस ठाण्यात नवा ट्विस्ट
लग्नाच्या गोंधळानंतर प्रकरण स्थानिक पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. मात्र, तिथेही एक नवाच धक्कादायक प्रकार घडला. पोलीस ठाण्यात नवरीने आपल्या आई-वडिलांसोबत जाण्यासही नकार दिला. तिने थेट आपल्या सहेलीसोबत जाण्याचा हट्ट धरला. 'मी कोणाचेही ऐकणार नाही आणि फक्त मैत्रिणीसोबतच जाणार,' या नवरीच्या जिद्दीने पोलीस आणि तिचे पालकही चक्रावून गेले आहेत. आता नवरीच्या कानात सहेलीने नक्की काय सांगितले होते आणि या अचानक आलेल्या निर्णयामागे काय रहस्य आहे, याची चर्चा संपूर्ण परिसरात रंगली आहे.