कोल्हापूर : देशभरात रविवारी पार पडलेल्या नीट २०२६ परीक्षेदरम्यान कोल्हापूर आणि इचलकरंजी येथे काही गंभीर त्रुटी समोर आल्या असून विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे. इचलकरंजीतील एएससी कॉलेज केंद्रावर पाण्याची बाटली आणण्यासाठी बाहेर गेलेल्या विद्यार्थ्याला पुन्हा परीक्षागृहात प्रवेश नाकारण्यात आल्याची घटना घडली, तर कोल्हापुरातील एका केंद्रावर तपासणी प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांचा सुमारे १० मिनिटांचा वेळ वाया गेल्याची तक्रार आहे.
देशभरात सुमारे २२.०९ लाख विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली असून गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत नोंदणी कमी झाल्याचे दिसून येते. यावरून वैद्यकीय शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल कमी होत असल्याची चर्चा सुरू आहे. इचलकरंजीतील घटनेत संबंधित विद्यार्थ्याचे बायोमेट्रिक पूर्ण झाल्यानंतर तो बाहेर कसा गेला, हा प्रश्न उपस्थित होत आहे. नियमांनुसार एकदा बायोमेट्रिक झाल्यानंतर विद्यार्थ्याला पुन्हा प्रवेश देणे अपेक्षित असताना तो नाकारण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात १३ केंद्रांवर परीक्षा पार पडली असून सुमारे ६ हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान, काही केंद्रांवर तपासणी व पेपरवरील माहिती लिहिण्याच्या प्रक्रियेत विलंब झाल्याने विद्यार्थ्यांचा वेळ वाया गेला, अशी पालकांची तक्रार आहे.
पेपरच्या स्वरूपाबाबत वैद्यकीय समुपदेशक अशोक शेट्टी यांनी सांगितले की, यंदाचा पेपर ‘मॉडरेट’ स्तराचा असला तरी तो खूपच प्रदीर्घ होता. जीवशास्त्र विभाग तुलनेने सोपा पण स्टेटमेंट-आधारित होता, तर भौतिकशास्त्र सर्वाधिक कठीण आणि वेळखाऊ ठरला. रसायनशास्त्र विभाग एनसीईआरटी-आधारित असला तरी काही गणिती प्रश्नांनी विद्यार्थ्यांना अडचणीत टाकले. या सर्व प्रकारांमुळे परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून संबंधित यंत्रणांनी याची दखल घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.