Kolhapur: कोतवालाच्या शिक्षक मुलाशी होणारा अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला!, भटजी मंडपातून पळाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 18:23 IST2026-05-12T18:23:17+5:302026-05-12T18:23:41+5:30
अक्षतारोपणासाठी जमलेल्यांसह वधु आणि वर पक्षातील मंडळींची घाबरगुंडी उडाली

Kolhapur: कोतवालाच्या शिक्षक मुलाशी होणारा अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला!, भटजी मंडपातून पळाले
गडहिंग्लज: कोतवालाच्या शिक्षक मुलाशी होणारा अल्पवयीन मुलीचा विवाह जिल्हा बाल कल्याण समितीच्या पथकाने रोखला. त्यानंतर समुपदेशन करून संबंधित मुलीची बालगृहात रवानगी करण्यात आली. गडहिंग्लज तालुक्यातील पूर्व भागातील एका गावातील या प्रकारामुळे सीमाभागात खळबळ उडाली आहे.
अधिक माहिती अशी, गडहिंग्लज तालुक्यातील पूर्व भागातील 'त्या' गावच्या कोतवालाचा मुलगा पंचक्रोशीतील मोठ्या गावातील प्रशालेत तासिका तत्त्वावर शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याच शाळेतील एका मुलीशी त्याचा विवाह निश्चित करण्यात आला होता. सोमवारी (११) दुपारी १२:२६ वा. अक्षता होत्या.
सोमवारी सकाळी जिल्हा बाल कल्याण समितीच्या हेल्पलाइनवर नियोजित विवाहातील मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पर्यवेक्षक जुबेर शिकलगार, भाग्यश्री गावडे, अस्मिता पोवार, राजश्री दळवाई यांचे पथक गडहिंग्लजमध्ये दाखल झाले. सहायक फौजदार अशोक पाटील यांच्यासमवेत अक्षतारोपणापूर्वीच ते विवाहस्थळी पोहचले. त्यामुळे अक्षतारोपणासाठी जमलेल्यांसह वधु आणि वर पक्षातील मंडळींची घाबरगुंडी उडाली.
दरम्यान, नवरदेव अक्षतारोपणासाठी विवाहवेदीवर हजर होता. परंतु, वधु अद्याप तिच्या खोलीतच होती. त्यामुळे समितीच्या सदस्यांनी तिची भेट घेऊन तिच्या जन्मतारखेची खातरजमा केली. त्यावेळी लग्नाच्या १८ वर्षे वयापेक्षा तिचे वय २ महिने १० दिवसांनी कमी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे दोन्ही बाजूच्या नातेवाइकांना बालविवाह प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीची माहिती देऊन नियोजित विवाह रोखण्यात आला. जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी सुहास वाईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
भटजी मंडपातून पळाले!
आजी- माजी जि.प. आणि पं.स. सदस्यांसह विविध राजकीय पक्ष- गटांचे प्रमुख व पंचक्रोशीतील अनेक मान्यवर मंडळीदेखील या लग्नसमारंभास उपस्थित होते. मात्र, नियोजित वधू अल्पवयीन असल्याचे निष्पन्न होताच लग्नाची गाठ बांधण्यासाठी आलेल्या भटजीसह मान्यवरांनीही मंडपातून पळ काढला. बेकायदेशीर गोष्टींची माहिती शासनाला देण्याची जबाबदारी असणाऱ्या कोतवालानेच ही चूक कशी केली? याचीच चर्चा गडहिंग्लजसह जिल्हयात सुरू आहे.
समितीसमोर होणार सुनावणी!
अल्पवयीन मुलीचा नियोजित विवाह रोखण्यात समितीला यश आले. परंतु, लग्नपत्रिकेची छपाई, साखरपुडा, हळद व देवकार्य आदी विधी पार पडले आहेत.त्यामुळे जिल्हा बालकल्याण समितीसमोर या प्रकरणाची रितसर सुनावणी होईल. त्यानंतरच त्या मुलीला नातेवाइकांच्या ताब्यात देण्याबाबतचा निर्णय समिती घेईल,असे पर्यवेक्षक जुबेर शिकलगार यांनी सांगितले.