महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 06:12 IST2026-04-29T06:00:09+5:302026-04-29T06:12:35+5:30

मुख्यमंत्र्यांनी महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत केले स्पष्ट, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोकुळ दूध संघात महायुतीची सत्ता असताना प्रशासक नियुक्ती कशासाठी अशी भूमिका रात्री साडेदहा वाजता घेतली. त्यानंतर साडेअकराच्या सुमारास मुख्यमंत्र्यासमवेत बैठक झाली. 

Controversy erupts in Mahayuti! Gokul Dudh Sangh will have an administrator; Difference between Eknath Shinde- Devendra Fadnavis? | महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?

महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?

विश्वास पाटील

कोल्हापूर - गोकुळ सहकारी दूध संघाच्या संचालक मंडळाची मुदत संपताच नवीन कायद्यातील तरतुदीनुसार तेथे प्रशासक येईलच असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या नेत्यासोबत मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीत स्पष्ट केले. संघावर प्रशासक येऊ नये यासाठी प्रयत्नशील असलेले वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे प्रयत्न निष्फळ झाले. गोकुळमधील सत्ताकारणावरून महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार पक्ष, शिंदेसेना आणि भाजप यांच्यातील वाद चांगलाच उफाळून आला आहे..सातारा, सांगली पाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यातही ही दरी वाढली आहे.

राज्य शासनाने सहकार कायद्यात दुरुस्ती करत अ वर्ग सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाची मुदत संपताच प्रशासक नियुक्ती करावी असे बदल नुकतेच केले आहेत. गोकुळच्या संचालक मंडळाची मुदत चार मे रोजी संपत आहे. त्यात गोकुळच्या कारभाराच्या चौकशीचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर गोकुळ मधील सत्तेतील महायुतीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. 

मंत्री मुश्रीफ यांनी गोकुळ दूध संघाचा कारभार मोठा असून तिथे महायुतीचाच अध्यक्ष आहे. त्यामुळे प्रशासक न नेमता विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ द्यावी किंवा त्यांचीच अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करावी अशी मागणी केली. मात्र कायद्यातील तरतुदीनुसार गोकुळवर प्रशासक येणार असे स्पष्ट करत अवसायनाचे मध्यंतरी आदेश काढलेले ११०८ दूध संस्थांची कायदेशीर तपासणी होऊ दे. ती लवकर कशी पूर्ण होईल असे पाहू..तोपर्यंत प्रशासक नेमला जाईल आणि चौकशी पूर्ण होताच निवडणूक घेतली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ही प्रक्रिया लवकरात लवकर संपवण्यासाठी शासन म्हणून आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. 

बैठकीला मंत्री मुश्रीफ यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार विनय कोरे, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदिप नरके, आमदार शिवाजीराव पाटील, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समिती कदम, गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, संचालिका शौमिका महाडीक आदी उपस्थित होते.

अशासकीय मंडळाचे धनंजय महाडिक अध्यक्ष शक्यता?

गोकुळवर प्रशासकाएवजी अशासकीय मंडळाची नियुक्ती करा व त्याचे अध्यक्षपद खासदार धनंजय महाडिक यांना द्या अशी मागणी ही भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केल्याचे समजते. मुख्यमंत्र्यांचा बैठकीतील एकूण नूर पाहता असा काही निर्णय होण्याचीच शक्यता असल्याचे बैठकीस उपस्थित सूत्रांनी सांगितले..

तासात बदलले चित्र..

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोकुळ दूध संघात महायुतीची सत्ता असताना प्रशासक नियुक्ती कशासाठी अशी भूमिका रात्री साडेदहा वाजता घेतली. त्यानंतर साडेअकराच्या सुमारास मुख्यमंत्र्यासमवेत बैठक झाली. त्यांनी मात्र अन्य कोणत्याही पर्यायचा विचार न करता प्रशासक नियुक्त होईल असे सांगून टाकले. उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्याने निवडणूक लागेल असे सत्ताधारी नेत्यांना वाटत होते पण तसे घडले नाही.

Web Title : महायुति में मतभेद! गोकुल दूध संघ पर प्रशासक की नियुक्ति तय

Web Summary : गोकुल दूध संघ को लेकर महायुति में मतभेद सामने आए। प्रयासों के बावजूद, नए नियमों के अनुसार मौजूदा बोर्ड का कार्यकाल समाप्त होने के बाद एक प्रशासक नियुक्त किया जाएगा। इस निर्णय से गठबंधन सहयोगियों के बीच दरार उजागर होती है।

Web Title : Disagreement in Mahayuti over Gokul Milk Union; Administrator Appointment Looming

Web Summary : Differences arose within the Mahayuti alliance regarding the Gokul Milk Union. Despite efforts to avoid it, an administrator will be appointed after the current board's term ends, as per new regulations. This decision highlights rifts between coalition partners.