भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 06:27 IST2026-04-29T06:26:33+5:302026-04-29T06:27:23+5:30
राज्यभर ‘ट्रिपिंग’च्या तक्रारी वाढल्या, उष्णतेमुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली असून त्याचा परिणाम जलविद्युत प्रकल्पांवर झाला आहे.

भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
नागपूर - राज्यात एप्रिलच्या अखेरीसच भीषण उष्णतेमुळे वीजेच्या मागणीत प्रचंड वाढ झाली असून ती ३२ हजार मेगावॉटच्या पुढे गेली आहे. मात्र, याच काळात औष्णिक वीज केंद्रांतील तीन युनिट्स बंद पडले असून, पाण्याअभावी जलविद्युत प्रकल्पांची क्षमता घटली आहे, परिणामी उत्पादनात मोठी घट झाल्याने राज्यात वीज संकटाची चाहूल लागली आहे. यामुळे चिंता वाढली आहे.
लोडशेडिंग नाही - महावितरण
महावितरणने राज्यात लोडशेडिंग होणार नसल्याचा दावा केला आहे. वाढत्या मागणीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून आवश्यकतेनुसार अल्पकालीन वीज खरेदीही केली जाईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे
वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचे ५५ रुग्ण
राज्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्माघाताच्या रुग्णसंख्येवर आरोग्य विभागाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. एकूण ५५ उष्माघातग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत १७ रुग्ण नोंदविण्यात आले होते. याच कालावधीत दोन मृत्यूंची नोंद झाली असली, तरी त्या मृत्यूंचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने साशंकता व्यक्त होत आहे.
पाणी व गॅस टंचाईचा बसणार फटका
उष्णतेमुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली असून त्याचा परिणाम जलविद्युत प्रकल्पांवर झाला आहे. २,५८०.२ मेगावॉट क्षमतेच्या प्रकल्पांकडून २१४ मेगावॉट वीज निर्मिती होत होती, तर चार प्रकल्प पूर्णपणे बंद होते. याशिवाय, ४३२ मेगावॉट क्षमतेच्या उरण गॅस प्रकल्पातून गॅसअभावी केवळ २६८ मेगावॉट उत्पादन होत आहे.
राज्यात मागणी जास्त, पुरवठा मात्र कमी
मंगळवारी राज्यातील वीज मागणी २९,५१ मेगावॉट इतकी होती, तर उत्पादन फक्त १७,८९८ मेगावॉट होते. महाजेनकोच्या ताप विद्युत केंद्रांकडून केवळ ६,०८४ मेगावॉट वीज निर्मिती होत होती. कोराडी (६६० मेगावॉट), नाशिक (२१० मेगावॉट), चंद्रपूर (५०० मेगावॉट) येथील प्रत्येकी एक युनिट बंद होती.