मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 05:35 IST2026-04-29T05:34:54+5:302026-04-29T05:35:44+5:30
मिरा रोड येथील दुहेरी चाकू हल्ला प्रकरण, आरोपीनं चिठ्ठीवर लिहिले इसीस, लाेन वुल्फ, कुणाच्या संपर्कात होता, तपास एटीएसकडे

मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
मुंबई - नयानगर परिसरातील दुहेरी चाकू हल्ल्याचा तपास महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपविण्यात आला असून, हा हल्ला ‘लोन वुल्फ’ प्रकारातील असू शकतो, अशी शक्यता तपास यंत्रणांकडून वर्तविण्यात आली आहे. जैब जुबेर अन्सारी (३१) असे अटक आरोपीचे नाव असून, त्याच्याकडे मिळालेल्या चिठ्ठीमध्ये हाताने लिहिलेल्या इसिस, लोन वुल्फ, जिहाद, गाझा अशा शब्दांचा उल्लेख असल्याचे सूत्रांनी सांगितले. तो ऑनलाइन कुणाच्या संपर्कात होता, याबाबत तपास सुरू आहे.
मिरा रोड येथील नयानगर परिसरात रविवारी सकाळी चाकू हल्ल्याची घटना घडली. अन्सारीने सुरक्षा रक्षक राजकुमार मिश्रा यांच्याशी वाद घातला. हा वाद चिघळल्यानंतर अन्सारीने मिश्रा यांच्यावर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. तसेच, हस्तक्षेप करण्यासाठी पुढे सरसावलेल्या दुसरा सुरक्षा रक्षक सुब्रतो सेन यांच्यावरही आरोपीने हल्ला केला. मिश्रा यांची प्रकृती चिंताजनक असून, सेन यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती मात्र स्थिर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
अन्सारी हा उच्चशिक्षित असून, तो अमेरिकेत वास्तव्यास होता, अशी माहिती तपासात समोर आली आहे. तो २००० मध्ये अमेरिकेत गेला आणि सुमारे १९ वर्षांनंतर भारतात परतला. त्याचे कुटुंब अमेरिकेत राहते. तो ऑनलाइन शिक्षक होता. तो अबुधाबी तसेच आखाती देशातील मुलांची ऑनलाइन शिकवणी घेत होता. काही महिन्यांपूर्वीपर्यंत तो एका कोचिंग क्लासमध्ये फिजिक्स आणि गणित विषय शिकवत होता, अशीही माहिती उघड झाली आहे.
धर्म विचारून केला हल्ला
सुरक्षा रक्षकांना धर्म विचारून आणि त्यांना कलमा पढ तरच सोडेन, असे धमकावत जैब अन्सारीने दोघा सुरक्षा रक्षकांवर हल्ला केला. जैबला ४ मे पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. पोलिसांनी नयानगर भागातील अस्मिता रिजेन्सी इमारतीमधील त्याचे घर सील केले आहे. आरोपीचे लग्न झाले असून मारहाण करीत असल्यामुळे पत्नीने तलाक घेतला आहे. सध्या तो एकटाच राहत होता. त्यापूर्वी कुर्ल्याला देखील तो राहत होता.
नोटेवरील मजकुराचा एटीएसकडून अभ्यास
तपासादरम्यान आरोपीकडे एक चिठ्ठी मिळून आली आहे. त्यामध्ये इसिस, लोन वुल्फ, जिहाद, गाझा अशा शब्दांचा उल्लेख असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच लोन वुल्फ हल्लेखोर तुमच्यावर झडप घालतील... अशा प्रकारच्या धमकीवजा व विस्कळीत विधानांचाही समावेश असल्याचे समोर येत आहे. एटीएस सध्या या मजकुराचा बारकाईने अभ्यास करत आहे. प्राथमिक तपासात काही बाबी संशयास्पद आढळल्याने हा तपास एटीएसकडे वर्ग करण्यात आला. अद्याप कोणत्याही संघटित दहशतवादी संघटनांशी त्याचे थेट कनेक्शन सापडले नसून तपास सुरू असल्याचे एटीएस अधिकाऱ्याने सांगितले.
‘लोन वुल्फ’ म्हणजे काय ?
लोन वुल्फ म्हणजे अशी व्यक्ती जी कोणत्याही दहशतवादी संघटनेच्या थेट आदेशाशिवाय किंवा मदतीशिवाय स्वतःच हिंसक कृत्य किंवा दहशतवादी हल्ला करते. ही व्यक्ती कट्टरपंथी विचारसरणीने प्रेरित असते; हल्ला एकट्यानेच आखते आणि अंमलात आणते.
हल्ल्यापूर्वी खात्यात रक्कम झाली जमा?
तपास यंत्रणा अन्सारीचे डिजिटल पुरावे आणि संपर्क तपासत आहेत. हल्ल्यापूर्वी त्याच्याकडे काही रक्कम जमा झाल्याची चर्चा आहे. त्या अनुषंगाने पोलिस त्याच्या बँक खात्याचाही तपास करत आहेत.
अन्सारीच्या कट्टरतेमागे कोण ? तपासात येईल पुढे : फडणवीस
मुंबईजवळील मीरा रोडवरील जैब जुबैर अन्सारी याने सुरक्षा रक्षकांवर केलेल्या ‘लोन वुल्फ ॲटॅक’च्या एटीएसने मोठी आघाडी घेतली असून, हल्ल्यापूर्वी त्याला मोठी रक्कम मिळाल्याचे तपासात समोर आले आहे. अन्सारी हा शिक्षक होता. तो अबुधाबी आणि इतर आखाती देशातील मुलांना ऑनलाइन शिकवायचा. एटीएसने त्याचा लॅपटाॅप अन् पेन ड्राईव्ह जप्त केला आहे. त्याच्या कट्टरतेमागे कोण कोण आहे, हे तपासात पुढे येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बार्शीत मंगळवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
हे प्रकरण स्वयंकट्टरतावादाचे...
अन्सारी याचा हा प्रकार म्हणजे, स्वयंकट्टरतावादाचे हे प्रकरण आहे. असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, पुस्तकं, साहित्य आणि इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर वापर करून आरोपी स्वतःच कट्टरतेकडे वळला. जिहादच्या उद्देशाने आणि इतर धर्मीयांची हत्या करण्याच्या हेतूने त्याने हा गुन्हा केला आहे. आरोपीचे कुटुंब अमेरिकेत असून तो स्वतःही भारताबाहेर राहिलेला होता, असे तपासात समोर आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.