विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 06:45 IST2026-04-29T06:45:36+5:302026-04-29T06:45:36+5:30
सध्या विमान इंधनाचा दर हा प्रति किलोमीटर तब्बल दोन लाख रुपयांपर्यंत वाढल्याची बाब या संघटनेने निदर्शनास आणून दिली

विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
मुंबई - अमेरिका-इराण युद्धामुळे विमान इंधनाचे दर वाढले आहेत. परिणामी, विमान उद्योगावर आर्थिक संकट आले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणी देशातील विमान कंपन्यांची शिखर संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्सने केली आहे. केंद्राने तातडीने दिलासा दिला नाही तर कंपन्यांना देशातील तसेच परदेशातील काही मार्गांवरील सेवा बंद करावी लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
केंद्राने तातडीने विमान इंधनावरील ११ टक्के अबकारी करात सूट द्यावी तसेच काही राज्यांत असलेल्या मूल्यवर्धित करात सूट द्यावी, असे संस्थेने सुचविले आहे. विमान इंधनाचा दर प्रतिकिलोमीटर दोन लाख रुपयांपर्यंत वाढल्याचेही निदर्शनास आणले आहे.
इंधनावरील खर्च ३० वरून ६० टक्क्यांवर पोहोचला
सध्या विमान इंधनाचा दर हा प्रति किलोमीटर तब्बल दोन लाख रुपयांपर्यंत वाढल्याची बाब या संघटनेने निदर्शनास आणून दिली. या व्यवसायात विमान इंधनावर ३० ते ४० टक्क्यांच्या आसपास खर्च होतो. सध्या इंधनावरचा हा खर्च ५५ ते ६० टक्क्यांवर गेला आहे. याचा परिणाम, कंपन्यांना त्यांचा व्यवसाय चालवण्यावर होत आहे. परिणामी, या दरवाढीला पायबंद घालण्याची या कंपन्यांनी केंद्राला साकडे घातले आहे.