कोल्हापूर : सैन्य दलातून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर शेअर मार्केटमधील गुंतवणुकीत नुकसान झाल्याने स्वत:च्याच घरातील दागिने लंपास करून चोरीचा बनाव करणाऱ्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. महेश सुभाष पाटील (वय २६, रा. राजगोळी बुद्रुक, ता. चंदगड), असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी त्याच्याकडून चोरीतील तीन लाखांचे सोने आणि चांदीचे दागिने हस्तगत केले. ही कारवाई बुधवारी (दि. १३) सकाळी कागल ते मुरगुड रोडवर पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाजवळ केली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत राजगोळी बुद्रुक येथील सेवानिवृत्त जवान महेश पाटील याच्या घरात शनिवारी (दि. ९) चोरी झाली होती. याची फिर्याद महेश यानेच दिली होती. या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील अंमलदार दीपक घोरपडे आणि प्रवीण पाटील यांना फिर्यादीवरच शंका आली.
राजगोळी परिसरात अधिक चौकशी केली असता, फिर्यादीनेच चोरी केल्याचे स्पष्ट झाले. बुधवारी सकाळी तो चोरीतील दागिने विक्रीसाठी कागल ते मुरगुड रोडवर येणार असल्याचे समजताच सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली.
अंगझडतीत त्याच्याकडे चोरीतील १३ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि १७५ ग्रॅम चांदीचे दागिने असा तीन लाखांचा मुद्देमाल मिळाला. शेअर मार्केटमधील झालेल्या नुकसानीमुळे स्वत:च्याच घरात चोरी केल्याची कबुली त्याने दिली. पुढील तपासासाठी त्याचा ताबा चंदगड पोलिसांकडे देण्यात आला. अंमलदार समीर कांबळे, अरविंद पाटील, अनिल जाधव, सचिन दुधाने यांनी कारवाईत सहभाग घेतला.
शेअर मार्केटमध्ये २० लाखांचे नुकसान
सैन्य दलात चार वर्षे सेवा बजावल्यानंतर महेश पाटील याने स्वेच्छा निवृत्ती घेतली. त्यानंतर तो शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत होता. यात सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. नुकसानीमुळे त्याने स्वत:च्याच घरातील दागिने चोरल्याचे पोलिसांनी सांगितले.
Web Summary : A retired soldier in Kolhapur, facing heavy losses in the stock market, staged a theft in his own home. Police arrested Mahesh Patil and recovered stolen gold and silver worth ₹300,000. He confessed to the crime due to ₹2,000,000 loss in share market investments.
Web Summary : कोल्हापुर में शेयर बाजार में भारी नुकसान के बाद एक सेवानिवृत्त सैनिक ने अपने ही घर में चोरी का नाटक किया। पुलिस ने महेश पाटिल को गिरफ्तार किया और ₹300,000 मूल्य के चोरी हुए सोने और चांदी के गहने बरामद किए। शेयर बाजार में ₹20,00,000 के नुकसान के कारण उसने अपराध कबूल किया।