Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 08:25 IST2025-11-16T08:24:05+5:302025-11-16T08:25:54+5:30
Kalyan Railway Station News: कल्याण स्टेशनवर लोकल अपघातात जखमी झालेल्या प्रवाशाचा रुग्णालयातून घरी पाठवताच मृत्यू झाला.

Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण: लोकलमधून उतरताना कल्याण रेल्वेस्थानकात पडून डेव्हिड घाडगे हे जखमी झाले. उपचारासाठी त्यांना रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये आणले. डॉक्टरांनी उपचार करून घरी पाठवले. मात्र, काही तासांनंतर घरीच त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी मृतदेह पुन्हा रुग्णालयात आणला आणि जोपर्यंत डॉक्टरावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली. डॉक्टरांनी ॲडमिट करून का घेतले नाही ? डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे हा प्रकार घडल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. कल्याणनजीक आंबिवली परिसरात राहणारे डेव्हिड घाडगे मुंबईतील एका नामांकित इंग्रजी शाळेत शिपाई आहेत.
डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप
शनिवारी घरी असताना डेव्हिड यांना एक्स-रेसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे होते. मात्र, घरीच त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी त्यांचा मृतदेह रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये आणून ठेवला आहे. घाडगे यांचा मुलगा तुषार आणि त्यांचे नातेवाईक गौतम मोरे यांचा आरोप आहे की डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे डेव्हिड यांचा मृत्यू झाला. जोपर्यंत डॉक्टरांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही शवविच्छेदन करू देणार नाही, मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर पोलिसही रुग्णालयात आले. पोलिसांकडून घाडगे कुटुंबाची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
केडीएमसीच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी काय म्हणाल्या?
नेमकं काय प्रकार घडला आहे, याची माहिती घेऊन शहानिशा केली जाईल. त्यानंतर पुढील योग्य कारवाई करण्यात येईल, असे केडीएमसीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी म्हटले.