‘केडीएमटी’ची मुरबाड बस किती बळी घेतल्यावर सुरू होणार? दोन्ही बाजूने एसटीच्या केवळ ३५ फेऱ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 11:20 IST2026-04-14T11:19:51+5:302026-04-14T11:20:20+5:30
Kalyan Accident News: मुरबाडला जाण्यासाठी एसटी हाच केवळ सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय आहे. कल्याण-मुरबाड मार्गावर कल्याणहून मुरबाडच्या दिशेने आणि मुरबाडहून कल्याणच्या दिशेने ३५ बस फेऱ्या चालविल्या जातात.

‘केडीएमटी’ची मुरबाड बस किती बळी घेतल्यावर सुरू होणार? दोन्ही बाजूने एसटीच्या केवळ ३५ फेऱ्या
कल्याण - मुरबाडला जाण्यासाठी एसटी हाच केवळ सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय आहे. कल्याण-मुरबाड मार्गावर कल्याणहून मुरबाडच्या दिशेने आणि मुरबाडहून कल्याणच्या दिशेने ३५ बस फेऱ्या चालविल्या जातात. अर्धा तासाच्या अंतराने बस येते. त्यातच कल्याण- मुरबाड मार्गावर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेची बस नसल्याने खासगी वाहनातून मुरबाडला जाण्याशिवाय प्रवाशांना पर्याय नाही. त्यामुळे आणखी किती बळी घेतल्यानंतर ‘केडीएमटी’ची मुरबाड बस सुरू होणार?, असा सवाल सोमवारच्या अपघातानंतर विचारला जात आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमांतर्गत (केडीएमटी) कल्याण-भिवंडी, कल्याण-वाशी, कल्याण-बेलापूर, कल्याण-मलंगगड, कल्याण-टिटवाळा, कल्याण- मोहने या मार्गावर बसेस चालविल्या जातात. त्याचप्रमाणे ‘केडीएमटी’ने कल्याण- मुरबाड बससेवा सुरू केल्यास प्रवाशांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा आणखी एक पर्याय उपलब्ध होऊ शकतो, याकडे उद्धवसेनेचे नगरसेवक संकेश भोईर यांनी लक्ष वेधले. कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाचे काम प्रस्तावित आहे. हा प्रकल्प लवकर पूर्ण झाला तर प्रवाशांना रेल्वे प्रवासाचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो.
अहिल्यानगर बसमध्ये प्रवेश नाही
मुरबाड मार्गावर कल्याण-अहिल्यानगर बस विठ्ठलवाडी डेपोतून चालविल्या जातात.
कल्याण-अहिल्यानगर मार्गावर प्रत्येक १५ मिनिटाला बस आहे.
या बस कल्याण- मुरबाडमार्गे अहिल्यानगरला माळशेज घाट पार करून जातात. मात्र, बसमध्ये लांब पल्ल्याचे प्रवासी असल्याने जवळच्या अंतराच्या प्रवाशांना काही वाहक प्रवेश नाकारतात. त्याचप्रमाणे मागून दुसरी बस येत आहे, असे सांगून बसू देत नाहीत.