पाच बहिणींनी 'नवसाचा भाऊ' गमावला; जुना वाद उफाळला अन् तरुणाचा पाठलाग करून खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 12:38 IST2026-05-15T12:37:21+5:302026-05-15T12:38:33+5:30
रुई गावात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत असून महिन्याभरात दुसरी हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे

पाच बहिणींनी 'नवसाचा भाऊ' गमावला; जुना वाद उफाळला अन् तरुणाचा पाठलाग करून खून
तीर्थपुरी (जि. जालना) : अंबड तालुक्यातील रुई येथे गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास राजेश (राजेंद्र) विष्णू कोरकाने (१८) या तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. एका महिन्यात रुई गावात हत्येची ही दुसरी घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेश हा लग्नानिमित्त काही मित्रांसोबत जिल्हा परिषद शाळेजवळ बसला होता. तिथे मित्रांमध्ये शाब्दिक वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने राजेश स्वतःचा जीव वाचवण्यासाठी गावातील एका जुन्या वाड्यामध्ये शिरला. मात्र, पाठलाग करणाऱ्या दोन संशयित आरोपींनी त्याला गाठून त्याच्यावर धारदार शस्त्राने भीषण वार केले. या हल्ल्यात राजेशचा जागीच मृत्यू झाला.
राजेश आणि संशयित आरोपी यांच्यात आठ दिवसांपूर्वीही बाचाबाची झाली होती. त्यावेळी राजेशच्या चुलतीने मध्यस्थी करून हा वाद मिटवला होता. मात्र, याच वादातून हा टोकाचा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच तीर्थपुरी पोलिसांनी तातडीने धाव घेत दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी डीएसपी, फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि फॉरेन्सिक टीम दाखल झाली असून पुराव्यांची तपासणी सुरू आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सुखापुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे.
पाच बहिणींचा 'नवसाचा भाऊ' गमावला
राजेश हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याला पाच मोठ्या बहिणी असून, पाच बहिणींनंतर नवसाने झालेला हा एकुलता एक भाऊ होता. आज राजेशच्या अकाली निधनाने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.
रुई गावात महिन्याभरात दुसरी हत्या
रुई गावात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अवघ्या महिन्याभरापूर्वी याच गावात मुलाने बापाची हत्या केल्याची घटना घडली होती. ती घटना ताजी असतानाच आता एका तरुणाचा खून झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.