बँक अधिकाऱ्यांचाच स्ट्राँग रूमवर डल्ला! सव्वासात कोटींचा घोटाळा, सीसीटीव्हीत चोरी कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 14:14 IST2026-04-25T14:13:43+5:302026-04-25T14:14:39+5:30
खिशात सोन्याची पाकिटे घालताना सीसीटीव्हीमध्ये बँक अधिकारी कैद! बदनापूर बँक घोटाळ्यात दोन आरोपी जेरबंद.

बँक अधिकाऱ्यांचाच स्ट्राँग रूमवर डल्ला! सव्वासात कोटींचा घोटाळा, सीसीटीव्हीत चोरी कैद
बदनापूर (जि. जालना): येथील कॅनरा बँक शाखेत सोन्याच्या दागिन्यांची चोरी आणि बनावट सोने गहाण ठेवून बँकेची ७ कोटी ३१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. २२ आणि २३ एप्रिल रोजी झालेल्या त्रैमासिक पुनर्मूल्यांकन प्रक्रियेदरम्यान हा घोटाळा उघडकीस आला. याप्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात शनिवारी पहाटे १ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने दोन आरोपींना अटक केली आहे.
सीसीटीव्हीमध्ये चोरीचे थेट दर्शन
तपासणी दरम्यान बँकेचे अधिकारी संजय आसाराम डोंगरे (रा. छत्रपती संभाजीनगर) हे स्ट्राँग रूममधून सोन्याची पाकिटे गुपचूप खिशात ठेवत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. सखोल चौकशीत असे निष्पन्न झाले की, स्ट्राँग रूममधून ३.५२ कोटी रुपयांची ३० सोन्याची पाकिटे गायब आहेत. तसेच, इतर २२ पाकिटांमध्ये अस्सल सोन्याच्या जागी ३.७९ कोटींचे बनावट सोने ठेवण्यात आले होते.
अधिकारी, मॅनेजर आणि सोनाराचे 'सिंडिकेट'
बँकेचे सहायक महाव्यवस्थापक केशवमूर्ती बी.व्ही. यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संजय डोंगरे यांनी प्रत्यक्ष चोरी केली. शाखा व्यवस्थापक विजेंद्र पाटणकर यांनी सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून डोंगरे यांना स्ट्राँग रूममध्ये एकटे सोडून कर्तव्यात कसूर केली. तर, सुवर्ण मूल्यमापक प्रवीण प्रभाकर बुऱ्हाडे याने बनावट सोन्याला 'खरे' असल्याचे प्रमाणपत्र देऊन बँकेची फसवणूक करण्यात मदत केली.