सासूच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या जावयाचा दगडाने ठेचून खून; जालन्यात महिनाभरात चौथी हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 16:55 IST2026-04-27T16:54:56+5:302026-04-27T16:55:28+5:30
सासूच्या अंत्यविधीनंतर घरी न परतलेल्या मच्छिंद्र दराडे यांचा रक्ताने माखलेला मृतदेह सापडला; जालन्यात गुन्हेगारीचा ग्राफ वाढला

सासूच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या जावयाचा दगडाने ठेचून खून; जालन्यात महिनाभरात चौथी हत्या
जालना: तालुक्यातील गोंदेगाव शिवारात सोमवारी सकाळी एका ५५ वर्षीय व्यक्तीचा दगडाने ठेचून खून झाल्याचे उघडकीस आले आहे. मच्छिंद्र कोंडीबा दराडे (रा. पाणेगाव, ता. अंबड) असे मृताचे नाव असून, ते आपल्या सासूच्या अंत्यसंस्कारासाठी गोंदेगावला आले होते. खुनाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी, हा खून त्यांच्याच एका जवळच्या नातेवाईकाने केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
रात्री निघून गेले अन् घात झाला
मिळालेल्या माहितीनुसार, मच्छिंद्र दराडे हे रविवारी सासूच्या अंत्यसंस्कारासाठी आले होते. विधी पार पडल्यानंतर ते नातेवाईकांकडेच थांबले होते. मात्र, रात्री ते कोणालाही न सांगता घरातून निघून गेले. सोमवारी सकाळी गोंदेगाव येथील ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राच्या पाठीमागील मोकळ्या जागेत त्यांचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष साबळे आणि उपनिरीक्षक दिगंबर पवार यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
महिनाभरात चौथा खून; पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह?
मच्छिंद्र दराडे यांच्या मुलीवर सध्या जालन्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका बाजूला मुलीचे आजारपण आणि सासूचा मृत्यू, अशा दुहेरी संकटात असतानाच मच्छिंद्र यांचा खून झाल्याने कुटुंबावर आभाळ फाटले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून दारूच्या बाटल्या, मृताची दुचाकी आणि काही साहित्य जप्त केले आहे. जालन्यात गेल्या महिनाभरात झालेल्या सलग चार खुनांच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांमधून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.