स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राजेश टोपे भाजपच्या तिकिटावर मैदानात? चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 12:27 IST2026-05-19T12:25:49+5:302026-05-19T12:27:52+5:30
जालना-औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मोठा उलटफेर? टोपेंनी सोडलं मौन

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राजेश टोपे भाजपच्या तिकिटावर मैदानात? चर्चांना उधाण
- विजय मुंडे
जालना : माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेश टोपे हे औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून टोपे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला होता. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या चर्चांना पुन्हा वेग आला असून, टोपे नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजेश टोपे यांनी १९९९ मध्ये अंबड विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा विजय मिळवत आपल्या राजकीय कारकिर्दीची दमदार सुरुवात केली होती. त्यानंतर २००४, २००९, २०१४ आणि २०१९ अशा सलग पाच विधानसभा निवडणुकांत त्यांनी विजयाची परंपरा कायम राखली. राज्य मंत्रिमंडळात त्यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री यांसह विविध महत्त्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली. तसेच जालना जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणूनही त्यांची राज्यभर ओळख निर्माण झाली.
मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत टोपे यांना पराभवाचा सामना करावा लागला. शिंदेसेनेचे उमेदवार हिकमत उढाण यांनी त्यांचा २,३०९ मतांनी पराभव केला होता. त्यानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत टोपे यांची चर्चा झाल्याचेही बोलले जात होते. जरी अद्याप त्यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केलेला नसला, तरी औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी भाजपकडून त्यांचे नाव चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी काही प्रभावी नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधल्याची माहितीही समोर येत आहे. त्यामुळे आगामी काळात टोपे यांच्या राजकीय भूमिकेकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.
कैलास गोरंट्यालही ‘रेस’मध्ये
एकीकडे राजेश टोपे यांच्या नावाची चर्चा सुरू असताना भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचे नावही औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी चर्चेत आहे. महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकावण्यात गोरंट्याल यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे मानले जाते. त्यामुळे भाजपकडून अखेर कोणाला उमेदवारी मिळते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
चर्चेला अर्थ नाही
आजच निवडणूक जाहीर झाली आहे. राजकीय वर्तुळात काही चर्चा होत असल्या तरी त्यात अर्थ नाही. भाजपकडून निवडणूक लढविण्याचा विषय नाही. मला काही बोलायचं असेल तर मी बोलेन.
-राजेश टोपे, माजी मंत्री