मध्य पूर्वेत युद्ध, जगावर इंधन, गॅस संकट; इराणची भीती दाखवून अमेरिकेने कमावला 'डबल फायदा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 17:35 IST2026-03-12T17:33:58+5:302026-03-12T17:35:29+5:30
इस्रायलप्रमाणे मध्य पूर्वेतील मुस्लीम देशांनी सुरक्षित बंकर निर्माण केले नव्हते. त्यामुळे मिसाइल आणि बॉम्बहल्ल्यामुळे अधिक लोक जखमी आणि मारले जात आहेत.

मध्य पूर्वेत युद्ध, जगावर इंधन, गॅस संकट; इराणची भीती दाखवून अमेरिकेने कमावला 'डबल फायदा'
वॉशिंग्टन - इराणविरुद्ध युद्ध लढणे अमेरिकेसाठी फायद्याचा सौदा ठरत आहेत. इराणची धास्ती दाखवून अमेरिकेने सौदी अरेबिया, तुर्की आणि इस्रायलसारख्या देशांना भरभरून शस्त्रे विकली. आता याच युद्धामुळे अमेरिकन कंपन्यांकडे तात्पुरत्या बंकरची मागणी मध्य पूर्वेत वाढली आहे. सौदी अरेबिया, कतार आणि यूएईसारख्या आखाती देशांमधील श्रीमंत लोक आधीच तयार केलेले बंकर खरेदी करत आहेत. एका बंकरची किंमत २५ लाख असून त्यात २ लोक सहजपणे लपू शकतात. जेव्हा या युद्धाची सुरुवात झाली तेव्हापासून आतापर्यंत ६० हून अधिक बंकरची विक्री मध्य पूर्वेत झाल्याचे अमेरिकन कंपनी एटलस सर्वाइवल शेल्टर्सने दिली आहे.
कंपनीचे संचालक म्हणाले की, मध्य पूर्वेतून सध्या मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. त्यात सर्वात वाईट परिस्थितीत वाचणाऱ्या बंकरची मागणी होत आहे. पुढील २ महिन्यात कमीत कमी ५०० बंकर मध्य पूर्वेतील देशांमध्ये विकले जाऊ शकतात असा दावा त्यांनी केला आहे. बंकरची साइज लहान असते. दुबई आणि दोहासारख्या बड्या शहरांमध्ये इमारती आहेत. जिथे ड्रोनद्वारे इराणी हल्ले सुरू आहेत. त्या हल्ल्यातून वाचण्यासाठी तिथले नागरिक तात्पुरत्या बंकरची खरेदी करत आहेत. अणु हल्ल्यापासून वाचणाऱ्या बंकरचीही मागणी लोक करत आहेत. त्याचा अर्थ तिथल्या लोकांना मध्य पूर्वेत येणाऱ्या काळात मोठ्या युद्धाची भीती आहे.
तर इस्रायलप्रमाणे मध्य पूर्वेतील मुस्लीम देशांनी सुरक्षित बंकर निर्माण केले नव्हते. त्यामुळे मिसाइल आणि बॉम्बहल्ल्यामुळे अधिक लोक जखमी आणि मारले जात आहेत. स्टॉक होम इंटरनॅशनलनुसार, २०२१-२५ या काळात अमेरिकेने जगातील १०० पैकी ४२ शस्त्रे एकट्याने विकले आहेत. २०१६-२० याकाळात हा आकडा ६० इतका होता. अमेरिकेने या काळात सर्वाधिक शस्त्रे सौदी अरेबियाला विकली आहेत. सौदी हा इराणचा कट्टर शत्रू मानला जातो. त्याशिवाय तुर्की, इजिप्त, इस्रायलसारख्या देशांनाही अमेरिकेने मोठ्या प्रमाणात शस्त्रे विकली आहेत. इराणची भीती दाखवून अमेरिकेने त्यांचा डबल फायदा करून घेतला आहे. त्यामुळेच शस्त्र विक्रीमध्ये अमेरिकेने स्वत:चा दबदबा वाढवला आहे.