गुप्तहेर, तंत्रज्ञान चोरी आणि रशियाशी कनेक्शन! जेफ्री एपस्टीन प्रकरणातील नव्या खुलाशानं जग हादरलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 17:54 IST2026-02-07T17:53:40+5:302026-02-07T17:54:15+5:30
नुकत्याच उघड झालेल्या एफबीआयच्या २०२० मधील एका गोपनीय दस्तऐवजातून एक अत्यंत धक्कादायक दावा समोर आला आहे.

गुप्तहेर, तंत्रज्ञान चोरी आणि रशियाशी कनेक्शन! जेफ्री एपस्टीन प्रकरणातील नव्या खुलाशानं जग हादरलं!
जगभरातील बड्या हस्तींशी संबंध आणि लैंगिक शोषणाच्या गंभीर आरोपांमुळे कुख्यात असलेला अमेरिकन अब्जाधीश जेफ्री एपस्टीन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकत्याच उघड झालेल्या एफबीआयच्या २०२० मधील एका गोपनीय दस्तऐवजातून एक अत्यंत धक्कादायक दावा समोर आला आहे. जेफ्री एपस्टीन हा इस्रायलची गुप्तचर संघटना 'मोसाद'साठी हेरगिरी करत होता, असे या अहवालात म्हटले आहे. या खुलाशामुळे जागतिक राजकारणात आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
मोसादचे कनेक्शन आणि ट्रेनिंग
एफबीआयच्या दस्तऐवजानुसार, एका गोपनीय सूत्राने दिलेल्या माहितीच्या आधारे हा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, इस्रायलचे माजी पंतप्रधान एहुद बराक यांच्या माहितीनुसार एपस्टीनला हेरगिरीसाठी तयार करण्यात आले होते. तो मोसादचा एक 'को-ऑप्टेड एजंट' म्हणून काम करत होता, असा निष्कर्ष सूत्राने काढला आहे. अमेरिकन निवडणुकांमध्ये परकीय हस्तक्षेपाच्या तपासादरम्यान ही माहिती समोर आली होती.
फोन कॉल्स आणि गुप्त माहितीची चोरी
या अहवालात हार्वर्डचे प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ एलन डर्शोविट्झ आणि एपस्टीन यांच्यातील संभाषणाचाही उल्लेख आहे. सूत्राने दावा केला आहे की, त्याने या दोघांमधील फोनवरील संभाषण ऐकून त्याच्या नोट्स काढल्या होत्या. ही सर्व माहिती पुढे 'मोसाद'पर्यंत पोहोचवली जात असे. डर्शोविट्झ स्वतः मोसादशी संबंधित असल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला होता, मात्र त्यांनी हे सर्व आरोप यापूर्वीच फेटाळून लावले आहेत.
रशिया आणि सिलिकॉन व्हॅलीचे धागेदोरे
केवळ इस्रायलच नाही, तर रशिया आणि तंत्रज्ञान चोरीचा अँगलही या अहवालातून समोर आला आहे. सिलिकॉन व्हॅलीमधील तंत्रज्ञान चोरण्यासाठी 'डे वन व्हेंचर्स' नावाची फर्म सक्रिय होती, असा दावा करण्यात आला आहे. या फर्मची संस्थापक माशा बुचर ही पूर्वी एपस्टीनची पब्लिसिस्ट होती आणि तिचे संबंध रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दाव्यांची पुष्टी होणे बाकी
दरम्यान, एफबीआयने या दस्तऐवजातील दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी केलेली नाही. हे सर्व आरोप एका विशिष्ट गोपनीय सूत्राने दिलेल्या माहितीवर आधारित आहेत. एपस्टीनचा २०१९ मध्ये तुरुंगात गूढ मृत्यू झाला होता, तेव्हापासून त्याच्याशी संबंधित अनेक गुपिते बाहेर येत आहेत. आता समोर आलेला हा हेरगिरीचा दावा या प्रकरणाला एक नवे आणि धोकादायक वळण देणारा ठरला आहे.