भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 11:55 IST2025-10-08T11:54:41+5:302025-10-08T11:55:51+5:30
भारत कधीही एक देश नव्हता. एक काळ असा होता जेव्हा ५४० संस्थानिक राज्ये होती. आपण अल्लाहच्या नावाने एक राष्ट्र निर्माण केले आहे असं त्यांनी सांगितले.

भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
नवी दिल्ली - ऑपरेशन सिंदूरनंतरभारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला आहे. त्यातच पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पुन्हा एकदा दोन्ही देशात युद्धाचे संकेत दिले आहेत. जर आता युद्ध घडलं तर त्यात पाकिस्तानचा मोठा विजय होईल अशी पोकळ धमकी ख्वाजा आसिफ यांनी भारताला दिली आहे. आसिफ यांनी याआधीही बऱ्याचदा वादग्रस्त विधाने केली आहेत. भारतीय हवाई दलाबद्दलही त्यांनी गरळ ओकली होती.
ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तानी न्यूज चॅनलच्या मुलाखतीत म्हटलं की, इतिहासात मागे वळून पाहिले तर भारत फक्त एक संस्थानिक राज्य म्हणून अस्तित्वात होते, ते १८ व्या शतकात आणि औरंगजेबाच्या काळात होते. भारत कधीही एक देश नव्हता. एक काळ असा होता जेव्हा ५४० संस्थानिक राज्ये होती. आपण अल्लाहच्या नावाने एक राष्ट्र निर्माण केले आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच वरून खालपर्यंत आपल्यात किती भांडणे सुरू आहेत. उत्तर ते दक्षिणेपर्यंत हेच सुरू आहे. या गोष्टींचा प्रभाव पडतो. पुन्हा एकदा युद्धासारखी परिस्थिती बनत असल्याचं मला वाटते. पण यावेळी युद्ध झाले तर अल्लाह आपल्याला आधीपेक्षाही जास्त मोठा विजय मिळवून देईल असा दावा पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केला आहे.
भारताने पाकला शिकवला धडा
पाकिस्तान भारताविरोधात कायम षडयंत्र रचत आला आहे. अनेकदा दहशतवादी हल्ले केले परंतु भारताने पहलगाम हल्ल्यानंतर चांगलाच धडा शिकवला आहे. भारताने ऑपरेशन सिंदूरमधून बदला घेतला. भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांना टार्गेट केले. भारतीय सैन्याने १०० हून अधिक दहशतवाद्यांना ठार केले. भारताने पाकिस्तानी सैन्य तळांवरही टार्गेट हल्ला केला.
राजनाथ सिंह यांची धमकी
अलीकडेच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सर क्रीक भागात पाकिस्तानच्या वाढत्या सैन्य हालचाली आणि बांधकामावर चिंता व्यक्त केली आहे. जर पाकिस्तानने या भागात कुठलेही धाडस करण्याचा प्रयत्न केला तर भारत त्याला जोरदार प्रत्युत्तर देईल असा इशारा त्यांनी दिला. सर क्रीकमध्ये पाकिस्तान त्यांचे सैन्य वाढवत आहे. जर पाकिस्तानने काही चुकीचं पाऊल उचलले तर त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल. कराचीला जाणारा एक रस्ता सर क्रीकमधून जातो हे पाकिस्ताननं लक्षात ठेवावे असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं होते.