बर्फाखाली दडलंय कुबेराचं धन! डोनाल्ड ट्रम्प यांना ग्रीनलँडच का हवंय? नेमकी काय आहे या मागाची रणनीती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 15:29 IST2026-01-18T15:28:31+5:302026-01-18T15:29:50+5:30
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ग्रीनलँडवर अमेरिकेचे नियंत्रण असावे, अशी इच्छा व्यक्त केल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे.

बर्फाखाली दडलंय कुबेराचं धन! डोनाल्ड ट्रम्प यांना ग्रीनलँडच का हवंय? नेमकी काय आहे या मागाची रणनीती?
जगातील सर्वात मोठे आणि अतिशय थंड बेट म्हणून ओळखले जाणारे ग्रीनलँड सध्या जागतिक राजकारणाचे केंद्र बनले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ग्रीनलँडवर अमेरिकेचे नियंत्रण असावे, अशी इच्छा व्यक्त केल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. रशिया आणि चीनच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी आणि ग्रीनलैंडमधील अफाट नैसर्गिक साधनसंपत्तीवर ताबा मिळवण्यासाठी ट्रम्प हे बेट खरेदी करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
काय आहे नेमका वाद?
ग्रीनलँड हे भौगोलिकदृष्ट्या उत्तर अमेरिका खंडाचा भाग असले तरी प्रशासकीयदृष्ट्या ते डेन्मार्कच्या अखत्यारीत येते. ट्रम्प यांनी यापूर्वीही हे बेट विकत घेण्याचा प्रस्ताव मांडला होता, ज्याला डेन्मार्कने हास्यास्पद म्हणून नाकारले होते. मात्र, आता पुन्हा एकदा ट्रम्प यांनी ग्रीनलँड अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी अनिवार्य असल्याचे विधान केल्याने दोन्ही देशांतील तणाव वाढण्याची शक्यता आहे.
बर्फाखालील 'खजिना' आणि महासत्तांची नजर
ग्रीनलँडचा सुमारे ८० टक्के भाग हा बर्फाखाली गाडला गेला आहे. मात्र, बदलत्या हवामानामुळे येथील बर्फ वितळू लागला आहे आणि त्यासोबतच जमिनीखाली दडलेल्या खजिन्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, ग्रीनलँडमध्ये दुर्मिळ पृथ्वी खनिजे, युरेनियम, लोखंड, सोने आणि हिऱ्यांचे मोठे साठे आहेत. याशिवाय, येथे तेल आणि नैसर्गिक वायूचा अफाट साठा असण्याची शक्यता आहे. याच साधनसंपत्तीवर कब्जा करण्यासाठी अमेरिका, रशिया आणि चीन यांसारख्या महासत्तांमध्ये आता स्पर्धा लागली आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने कवच
ट्रम्प यांच्या दाव्यानुसार, हा केवळ खनिजांचा विषय नसून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे. ग्रीनलँडची भौगोलिक स्थिती अशी आहे की, तिथून रशिया किंवा अन्य शत्रू देशांकडून होणाऱ्या क्षेपणास्त्र हल्ल्यांची पूर्वसूचना मिळू शकते. अमेरिकेचा 'पिटुफिक स्पेस बेस' आधीच तिथे कार्यरत आहे. जर अमेरिका येथे कमकुवत पडली, तर चीन किंवा रशिया आपले तळ ठोकू शकतात, अशी भीती अमेरिकेला सतावत आहे.
स्थानिक परिस्थिती आणि अर्थव्यवस्था
२२ लाख चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या या बेटाची लोकसंख्या अवघी ५६ हजार आहे. येथील अर्थव्यवस्था प्रामुख्याने मासेमारीवर अवलंबून आहे आणि आर्थिक मदतीसाठी ते डेन्मार्कवर विसंबून आहेत. येथील 'इनुइट' समुदायाला आपल्या संस्कृतीची काळजी आहे, तर काही स्थानिकांना वाटते की खाणकाम सुरू झाल्यास ग्रीनलँड आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकेल. ग्रीनलँड हे आता केवळ एक थंड बेट उरलेले नसून, ते आगामी काळातील जागतिक सत्तेच्या संघर्षाचे मुख्य रणांगण ठरणार आहे.