एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 13:17 IST2026-05-13T13:14:55+5:302026-05-13T13:17:42+5:30

पश्चिम भारतातील बौद्ध, ब्राह्मणी आणि जैन परंपरांशी संबंधित सुमारे ९०० शैल-कोरीव स्थळांपैकी १३० स्थळे मुंबई परिसरातील बेटांवर, विशेषतः एलिफंटा आणि साल्सेट येथे आढळतात.

Elephanta to Naneghat: Ancient trade 'corridor' comes to light; Archaeological Department excavations confirm trade | एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब

एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब

-मधुकर ठाकूर, उरण 
एलिफंटा बेट हे केवळ धार्मिक आणि शैलकलेसाठी प्रसिद्ध नसून, प्राचीन काळातील आंतरराष्ट्रीय सागरी व्यापाराचे महत्त्वपूर्ण केंद्र होते, याचे ठोस पुरावे भारतीय पुरातत्व विभागाच्या उत्खननातून समोर आले. भारतीय पुरातत्व विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अभिजित आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या उत्खननात रोमन अँफोराचे तुकडे, आयातीत सिरॅमिक्स, काचेच्या वस्तू, पश्चिम आशियातील टॉर्पेडो जार, क्षत्रप व कलचुरी नाणी यांसारखे महत्त्वाचे पुरावे आहेत. 

उत्खननातील निष्कर्षांनुसार, समुद्रमार्गे आलेला आयात माल एलिफंटा येथे उतरविण्यात येत होता. तेथून तो उल्हास खाडीमार्गे कल्याणपर्यंत जाई आणि पुढे नाणेघाट खिंडीतून जुन्नर व दख्खनच्या अंतर्भागात पोहोचवला जात असे. त्याचप्रमाणे दख्खनमधील निर्यात मालही याच मार्गाने समुद्रापर्यंत आणला जात होता.  

उत्खननातून मिळणार उत्तर

डॉ. आंबेकर यांच्या मते, एलिफंटावरील भव्य गुहा आणि स्थापत्यकला यांचा केवळ धार्मिक दृष्टीने अभ्यास झाला होता. मात्र, एका लहान आणि भरती-ओहोटीचा परिणाम होणाऱ्या बेटावर एवढी मोठी धार्मिक व स्थापत्य गुंतवणूक का झाली, याचे उत्तर आता उत्खननातून मिळू लागले आहे. 

पश्चिम भारतातील बौद्ध, ब्राह्मणी आणि जैन परंपरांशी संबंधित सुमारे ९०० शैल-कोरीव स्थळांपैकी १३० स्थळे मुंबई परिसरातील बेटांवर, विशेषतः एलिफंटा आणि साल्सेट येथे आढळतात. हे केंद्रीकरण योगायोग नसून व्यापार, देवाणघेवाण आणि प्रवासी हालचालींशी निगडित असल्याचे ते सांगतात.  

कोणता ‘खजिना’?

उत्खननात सापडलेल्या मोठ्या आकाराच्या साठवण भांड्यांनी संशोधकांचे विशेष लक्ष वेधले आहे. एका भांड्याची उंची सुमारे १.२५ मीटर असून, त्याशेजारी विटांनी बांधलेल्या आणि खडकात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या सापडल्या आहेत.

माल हस्तांतरणाचे होते केंद्र 

एलिफंटा आणि व्यापारी समुदायातील संबंध आधुनिक काळातही दिसून येताे. शेतबंदर येथून गुहेकडे जाणाऱ्या दगडी पायऱ्या १८५४ मध्ये ठाकर करमसी रणमल लोहाना यांनी बांधल्या होत्या. 

लोहाना समाज ऐतिहासिकदृष्ट्या सागरी व भू-व्यापारात सक्रिय असल्याने या वारशाची सलगता अधोरेखित होते. डॉ. आंबेकर यांनी सांगितले की, उत्खननातील शोधांमुळे प्रख्यात पुरातत्त्ववेत्ता एस. आर. राव यांच्या मताला बळ मिळाले आहे. 

एलिफंटा बेट हे जहाजांच्या नांगर टाकण्याचे आणि माल हस्तांतरणाचे केंद्र होते, हा त्यांचा दावा आता अधिक ठोस पुराव्यांसह समोर येत आहे.

Web Title : एलिफेंटा से नाणेघाट: प्राचीन व्यापार ‘गलियारा’ उत्खनन से उजागर।

Web Summary : उत्खनन से एलिफेंटा एक प्रमुख प्राचीन व्यापार केंद्र के रूप में सामने आया। कलाकृतियाँ नाणेघाट के माध्यम से एक व्यापार मार्ग का सुझाव देती हैं, जो समुद्री आयात को दक्कन के आंतरिक भाग से जोड़ता है। खोज एलिफेंटा के धार्मिक स्थलों में निवेश की व्याख्या करती है।

Web Title : Elephanta to Naneghat: Ancient trade 'corridor' revealed by excavation.

Web Summary : Excavations reveal Elephanta as a key ancient trade hub. Artifacts suggest a trade route via Naneghat, linking maritime imports to Deccan's interior. Discoveries explain investment in Elephanta's religious sites.

टॅग्स :historyइतिहास