शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; प्रकरण काय आहे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 12:55 IST2026-05-13T12:49:28+5:302026-05-13T12:55:53+5:30
लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ मधील कलम ३३ए आणि कलम ३६ नुसार उमेदवाराने सत्य आणि संपूर्ण माहिती देणे बंधनकारक आहे.

शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; प्रकरण काय आहे?
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत दिवा परिसरातून निवडून आलेल्या शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात उच्च न्यायालयात इलेक्शन रिट पिटिशन दाखल झाले आहे.
निवडणूक शपथपत्रात कथितपणे चुकीची, अपूर्ण माहिती सादर केल्याचा आरोप याचिकेत केला. याचिकेबाबत ॲड. रोहिदास मुंडे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, संबंधित नगरसेवकांनी प्रतिज्ञापत्रात मालमत्ता, बांधकामे, आर्थिक व्यवहार तसेच इतर महत्त्वाची माहिती पूर्णपणे जाहीर केली नाही.
‘सत्य माहिती बंधनकारक’
लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ मधील कलम ३३ए आणि कलम ३६ नुसार उमेदवाराने सत्य आणि संपूर्ण माहिती देणे बंधनकारक आहे. खोटी माहिती सादर करणे किंवा तथ्य लपविणे मतदारांची दिशाभूल करणारे कृत्य मानले जाते, असेही त्यांनी सांगितले.
सर्व आरोप चुकीचे आणि बिनबुडाचे आहेत. न्यायालयात त्यांनी खोटी माहिती दिली आहे. न्यायालयासमोर आम्ही बाजू मांडू. निवडणुकीत त्यांचा ज्या पद्धतीने पराभव झाला, तसाच पराभव न्यायालयीन लढाईत होईल.
-ॲड. आदेश भगत, नगरसेवक, शिंदेसेना, दिवा