इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 13:40 IST2026-04-22T13:40:06+5:302026-04-22T13:40:49+5:30
Iran's new Nuclear Weapon: इराणकडून शस्त्रसंधी वाढवण्यासंदर्भात कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा झालेली नसताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधी वाढवत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे अमेरिकेची पंचाईत झाल्याच्या चर्चेला तोंड फुटले आहे.

इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
इस्रायल-अमेरिकेने इराणविरोधातयुद्ध छेडले, ते इराणकडे अण्वस्त्रे असल्याच्या मुद्द्यावरून. पण, या युद्धाच्या काळात इराणला नवे अण्वस्त्र मिळाले आहे, ते म्हणजे होर्मुझ सामुद्रधुनी! होर्मुझ सामुद्रधुनीचा वापर करत इराणने अमेरिकेला घायकुतीला आणले आहे. इराणचे हेच अण्वस्त्रापेक्षा जास्त विध्वंसक अस्त्र आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ताब्या घेण्याचा प्रयत्न करू लागले आहेत.
अनेक दशकांपासून अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या अण्वस्त्र योजनेला लक्ष्य केले आहे. इराणने अण्वस्त्र विकसित केली, तर या भागात शस्त्रास्त्रांची स्पर्धा सुरू होईल आणि जगातील एक तृतीयांश तेल, वायू तसेच मोठ्या प्रमाणात खतांचे उत्पादन करणाऱ्या या प्रदेशात अस्थिरता निर्माण होईल.
अमेरिका इराणबद्दल असुरक्षित होण्याचे कारण म्हणजे धोरणात्मक नियंत्रण गमावण्याचा असलेला धोका. कारण इराण अण्वस्त्र सज्ज झाला, तर शेजारील आखाती देशातील सत्तासमीकरणे बदलू शकतो, त्याचा थेट परिणाम हा जागतिक व्यापार आणि वाहतुकीच्या महत्त्वपूर्ण केंद्रावर होईल.
अमेरिकेचे युरेनियम केंद्रांवर हल्ले अन् इराणला मिळाले नवे अण्वस्त्र
युरेनियम संवर्धनाची ६० टक्क्यांची मर्यादा ओलांडण्याची इराणची ताकद नष्ट करण्यासाठी आणि त्यांच्या क्षेपणास्त्र साठ्याचे नुकसान करण्यासाठी अमेरिकेने वर्षभरात दोन वेळा अण्वस्त्र आणि लष्करी तळांवर हवाई हल्ले केले.
हे हल्ले बऱ्यापैकी यशस्वी झाले आहेत; जे सॅटेलाइट फोटो समोर आले आहेत, त्यात अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र क्षमतेचे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. जून २०२५ मध्ये अमेरिकेने इस्फान, नतांझ आणि फोर्डोवर टाकलेल्या 'बंकर बस्टर' बॉम्बमुळे आणि मार्च २०२६ मध्ये क्षेपणास्त्र डेपोंवर केलेल्या हल्ल्यांनंतर याबद्दलची माहिती समोर आली. पण या सगळ्यातून इराणच्याच हाती महत्त्वाचे शस्त्र लागले. ते म्हणजे त्यांच्याकडे आधीपासूनच एक अण्वस्त्र आहे आणि ते म्हणजे 'होर्मुझची सामुद्रधुनी'.
नाकेबंदी करून झटका
तेल जहाजांच्या वाहतुकीवर इराणने निर्बंध घातले आणि त्यातून स्पष्ट झाले की ही सामुद्रधुनी, जिथून जगातील सुमारे २० टक्के कच्चे तेल आणि गॅसची वाहतूक होते, ती भौगोलिकदृष्ट्या अण्वस्त्रासारखीच शक्तीशाली आहे.
क्षेपणास्त्र स्वरूपातील अण्वस्त्रे ही मोठ्या प्रमाणावर विध्वंस, जीवितहानी आणि दीर्घकालीन किरणोत्सर्गाच्या धोका असल्यामुळे जरब बसवतात. अण्वस्त्र एकदा वापरले की, त्यातून होणारा विध्वंस परत नीट कोणताही पर्याय नसतो.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अण्वस्त्रे तयार करणे आणि त्यांची देखरेख करणे सर्वात महागडे आणि धोकादायक असते. पण, इराणच्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील घट्ट पकडीमुळे विध्वंस होत नाही, पण त्याचा आर्थिक फटका प्रचंड बसू शकतो.
एक निर्णय आणि तेल संकट उद्भवले
इराणने तेल जहाजांना सामुद्रधुनी ओलांडण्यापासून रोखले. काही जहाजांवर हल्ले केले. त्यामुळे झाले असे की, ज्यामुळे विम्याचे हप्ते आणि भाड्याचे दर गगनाला भिडले. काही तासांतच तेल जहाजांच्या वाहतुकीची संख्या घटली. बंदरांवरील टर्मिनल्समध्ये साठवलेल्या कच्च्या तेलाचा साठा वाढत गेला, ज्यामुळे तेलाच्या किमती प्रति बॅरल ११० डॉलरच्या धोक्याच्या पातळीच्या पुढे गेल्या आणि उत्पादनही मंदावले. या सगळ्याचा परिणाम म्हणजे गेल्या अनेक दशकांतील सर्वात मोठे तेल संकट उभे राहिले.
अमेरिकेसाठी मेसेज काय?
इराणच्या 'होर्मुझ' अस्त्राने अमेरिकेला थेट संदेश दिला की, या युद्धाबद्दल पुन्हा विचार करावा लागेल. अमेरिकेला अंदाजे ४४० किलो ६० टक्के संवर्धित युरेनियम मिळवायचे आहे, जे अण्वस्त्र बनवण्याच्या ९० टक्क्यांच्या मर्यादेपेक्षा कमी असले तरी ८ ते १२ बॉम्ब बनवण्यासाठी पुरेसे आहे हा एक धोरणात्मक विजय आहे, पण यामुळे इराणची होर्मुझ सामुद्रधुनीवरील पकड संपत नाही.
ती पकड ढिली करण्यासाठी अमेरिकेला इराणचे युरेनियम जप्त करणे किंवा संवर्धन सुविधा नष्ट करण्यापेक्षा अधिक काही करावे लागेल, कारण या दोन्ही गोष्टी तात्पुरत्या उपाययोजना आहेत.
अमेरिकेकडून होर्मुझ सामुद्रधुनी ताब्यात घेण्याचे प्रयत्न
गेल्या काही दिवसात अमेरिकेकडून होर्मुझ सामुद्रधुनीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. होर्मुझ आणि अरबी समुद्राच्या दरम्यान युद्धनौका तैनात करणे, यातून स्पष्ट मेसेज दिला गेला की, ट्रम्प यांनी आपला मोर्चा हवाई हल्ल्यांवरून नौदल मोहिमेकडे वळवला आहे आणि सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवणे हे आता मोहिमेचे ध्येय आहे.
होर्मुझ हेच इराणचे नवे अण्वस्त्र
इराणला गुडघ्यावर आणण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून केला गेला. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांना संपवल्यामुळे इराणमध्ये दुफळी निर्माण होईल. राजवट कोसळले असा अंदाज होता, पण अमेरिकेचे अंदाज चुकले. त्यानंतर इराणने थेट होर्मुझ सामुद्रधुनी बंद करूनच अमेरिकेला बेजार केल्याचे दिसू लागले आहे. दिवसेंदिवस अमेरिकेचे धोरण इराणबद्दल अपयशी ठरताना दिसत असून, इराणचे नवे अण्वस्त्र जास्त घातक ठरताना दिसत आहे.