Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 14:37 IST2026-04-22T14:33:35+5:302026-04-22T14:37:04+5:30
Jara Hatke: चहात बिस्कीट बुडवून खाणे ही अनेकांची आवड असते पण ही प्रथा कशी सुरु झाली आणि बिस्किटांच्या निर्मितीचा रंजक इतिहास काय होता ते जाणून घेऊ.

Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
चहा-खारी, बिस्किटे किंवा ब्रेड-बटरची जोडी ही जगभरात, विशेषतः भारतात प्रचंड लोकप्रिय आहे. चहाचा एक घोट आणि सोबतीला बिस्किटाचा तुकडा नसेल, तर चहाप्रेमींना तो चहा अपूर्णच वाटतो. पण चहा आणि या स्नॅक्सच्या जोडीचा रंजक इतिहास प्रवास कधी आणि कसा सुरु झाला माहितीय का?
१. ब्रिटिश काळ आणि 'हाय टी' (High Tea) संस्कृती
चहा भारतात ब्रिटिशांनी आणला, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण त्यासोबत बिस्किटे खाण्याची पद्धतही त्यांच्याकडूनच आली. ब्रिटनमध्ये 'आफ्टरनून टी' किंवा 'हाय टी'ची परंपरा होती. तिथे चहासोबत छोटे केक्स, कुकीज आणि सँडविच खाल्ले जायचे. ही पद्धत उच्चभ्रू समाजात प्रतिष्ठेचे लक्षण मानली जात असे.
२. बिस्किटांचा प्रवास: औषध ते स्नॅक
सुरुवातीच्या काळात बिस्किटे ही आजच्यासारखी गोड आणि चविष्ट नव्हती. ती कडक असायची आणि प्रामुख्याने प्रवासात किंवा युद्धात सैनिकांसाठी अन्न म्हणून वापरली जात असत, कारण ती लवकर खराब होत नसत. पुढे त्यात साखर आणि लोणी (Butter) घालून त्यांचे स्वरूप बदलले आणि ती चहाचा अविभाज्य भाग बनली.
३. भारतीयांची Dunking संस्कृती
भारतीयांनी ब्रिटिशांची चहाची पद्धत स्वीकारली, पण त्यात स्वतःची देशी चव मिसळली. बिस्किट किंवा टोस्ट चहामध्ये बुडवून (Dip करून) खाण्याची पद्धत भारतात प्रचंड लोकप्रिय झाली. कडक बिस्किट चहामध्ये बुडवल्यावर जे मऊ आणि चविष्ट लागते, ती मजा भारतीयांसाठी खास आहे. यामुळेच 'पार्ले-जी' सारख्या बिस्किटांनी घराघरांत स्थान मिळवले.
४. ब्रेड, बन-मस्का आणि इराणी कॅफे
केवळ बिस्किटेच नाही, तर ब्रेड आणि चहाचे नातेही जुने आहे. मुंबई-पुण्यातील इराणी कॅफेंनी 'बन-मस्का' आणि चहा ही जोडी घराघरांत पोहोचवली. कडक चहा आणि लोणी लावलेला मऊ बन किंवा पाव, हा अनेकांचा आवडता नाश्ता बनला. तसेच, खारी आणि टोस्ट (रस्क) यांचाही चहासोबतचा प्रवास असाच ऐतिहासिक आहे.
५. ही जोडी इतकी लोकप्रिय का?
शास्त्रीयदृष्ट्या पाहिले तर चहामधील 'कॅफिन' आणि बिस्किटांमधील 'साखर' आणि 'कार्बोहायड्रेट्स' यांचा संगम शरीराला त्वरित ऊर्जा देतो. त्यामुळेच कामाच्या व्यापात किंवा संध्याकाळच्या थकव्यावेळी ही जोडी आपल्याला ताजेतवाने करते.
६. ग्रामीण भागात चहा चपातीला पसंती
आजही ग्रामीण भागात बिस्कीट, ब्रेड, बन हे श्रीमंती चोचले मानले जातात. त्यामुळे सकाळच्या न्याहारीला चहासोबत गरम गरम तव्यावरची चपाती ताटात येताच ती चहात बुडवून खाल्ली जाते. एक-दोन चपात्या खाल्ल्या की दुपार पर्यंत भूक लागत नाही वा अन्य काही खावेसे वाटत नाही.
एकूणच काय चहा पिण्यासाठी वाटाड्या लागतोच, मग कधी ओळखी/अनोळखी व्यक्ती चालते तर कधी चपाती, बिस्कीट, ब्रेड, बन हे देखील सोबती बनून चहाचा आनंद द्विगुणीत करतात.