इराण-इस्त्रायल युद्धाचा भारताला पहिला फटका! ओमानच्या समुद्रात भारतीय खलाशाचा मृत्यू, ड्रोन बोटने झाला हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 18:19 IST2026-03-02T18:02:09+5:302026-03-02T18:19:44+5:30

ओमानमध्ये मानवरहित ड्रोन बोटचा टँकरवर भीषण हल्ला झाल्याने एका भारतीयाचा मृत्यू झाला.

Gulf Crisis Deepens Indian Sailor Dead as Unmanned Drone Boat Strikes Oil Tanker Near Oman | इराण-इस्त्रायल युद्धाचा भारताला पहिला फटका! ओमानच्या समुद्रात भारतीय खलाशाचा मृत्यू, ड्रोन बोटने झाला हल्ला

इराण-इस्त्रायल युद्धाचा भारताला पहिला फटका! ओमानच्या समुद्रात भारतीय खलाशाचा मृत्यू, ड्रोन बोटने झाला हल्ला

Oil Tanker Attack इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धाची धग आता भारतापर्यंत पोहोचली आहे. ओमानच्या किनारपट्टीवर एका ऑईल टँकरवर झालेल्या ड्रोन बोट हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर बिघडलेल्या परिस्थितीत हा सागरी हल्ला झाल्याने संपूर्ण आखाती क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

इंजिन रूममध्ये भीषण स्फोट आणि आग

मिळालेल्या माहितीनुसार, एमकेडी व्योम नावाचे हे ऑईल टँकर मस्कटमधील पोर्ट सुल्तान काबूसपासून ५२ नॉटिकल मैल अंतरावर होते. या टँकरवर मार्शल आयलंडचा ध्वज होता आणि त्यात सुमारे ५९,४६३ मेट्रिक टन माल भरलेला होता. शनिवारी एका मानवरहित बोटीने या टँकरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की टँकरच्या मुख्य इंजिन रूममध्ये मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली. या स्फोटात एका भारतीय खलाशाने आपला जीव गमावला.

२१ कर्मचाऱ्यांपैकी १६ भारतीय

या जहाजावर एकूण २१ कर्मचारी तैनात होते. यामध्ये १६ भारतीय, ४ बांगलादेशी, १ युक्रेनियन कर्मचाऱ्याचा समावेश आहे. उर्वरित सर्व २० कर्मचाऱ्यांना पनामाच्या एमव्ही सँड या व्यापारी जहाजाने सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. ओमानच्या रॉयल नेव्हीने आता या टँकरची जबाबदारी स्वीकारली असून परिसरातील इतर जहाजांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

युद्धाचा भडका आणि इराणवर संशय

अयातुल्ला खामेनी यांच्या हत्येनंतर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडणाऱ्या जहाजांना गंभीर परिणाम भोगण्याचा इशारा दिला होता. खामेनींच्या मृत्यूनंतर मालवाहू जहाजांवर झालेला हा दुसरा मोठा हल्ला आहे. याआधी स्कायलाईट नावाच्या पलाव ध्वजाखालील टँकरवरही असाच हल्ला झाला होता, ज्यात ४ खलाशी जखमी झाले होते. त्या जहाजावरही १५ भारतीय होते.

जागतिक तणाव वाढला

या हल्ल्यामागे नेमका कोणाचा हात आहे, हे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. मात्र, अमेरिकन आणि इस्रायली हल्ल्यांचा बदला घेण्यासाठी इराणकडून या ड्रोन बोट्सचा वापर केला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय तेल पुरवठा साखळीवर आणि हिंदी महासागरातील सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 

Web Title : ओमान में तेल टैंकर पर हमला, भारतीय नाविक की मौत; ईरान-इज़राइल तनाव बढ़ा

Web Summary : ओमान में एक तेल टैंकर पर ड्रोन हमले में एक भारतीय नाविक की मौत हो गई। ईरान-इज़राइल के बीच बढ़ते तनाव के बीच हुए इस हमले ने समुद्री सुरक्षा और वैश्विक तेल आपूर्ति को लेकर चिंता बढ़ा दी है।

Web Title : Indian Sailor Dies in Oman Tanker Attack; Iran-Israel Tensions Rise

Web Summary : An Indian sailor died in an Oman oil tanker drone attack amid rising Iran-Israel tensions. The attack, following unrest in Iran, targeted the MKD Vyom, raising concerns about maritime security and global oil supply.