अखेर तोंडातून खरे बाहेर आले, ट्रम्प यांनी जाहीरपणे कबूल केले; “इराण युद्धामुळे खूप नफा झाला”
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 14:16 IST2026-03-13T14:16:57+5:302026-03-13T14:16:57+5:30
America Donald Trump News: संघर्ष, युद्ध आणि तणावामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमती झपाट्याने वाढत आहेत.

अखेर तोंडातून खरे बाहेर आले, ट्रम्प यांनी जाहीरपणे कबूल केले; “इराण युद्धामुळे खूप नफा झाला”
America Donald Trump News: ज्या देशांमध्ये युद्ध होते, त्यांचे अतोनात नुकसान होते. जीवितहानी होते, मालमत्तांचे नुकसान होते, आर्थिकदृष्ट्याही नुकसान होते. आताच्या घडीला अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात मोठे युद्ध सुरू आहे. कोणताच देश माघार घ्यायला तयार नाही. एकीकडे अमेरिका युद्ध जिंकल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला असला, तरी इराणकडून कारवाया सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. हॉर्मुझ सामुद्रधनुवरून रान पेटले आहे. अशातच इराण युद्धामुळे अमेरिकेचा मोठा फायदा झाला, अशी कबुली राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्याचे म्हटले जात आहे.
अमेरिका इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध कधी संपेल, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. यातच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे एक विधान चर्चेत आहे. युद्धामुळे कच्च्या तेलची पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे, त्यामुळे किमती वाढल्या आहेत. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती अमेरिकेला आर्थिक फायदा देऊ शकतो, असा दावा ट्रम्प यांनी केल्याचे सांगितले जात आहे.
जेव्हा तेल महाग असते, तेव्हा आपण खूप पैसे कमवतो
सोशल मीडियावर ट्रम्प म्हणाले की, अमेरिका हा जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे, म्हणून जेव्हा तेलाच्या किमती वाढतात तेव्हा देश अधिक कमाई करतो. जेव्हा तेल महाग असते, तेव्हा आपण खूप पैसे कमवतो. आमची प्राथमिकता इराणला अण्वस्त्रे मिळविण्यापासून रोखणे आहे. तसेच दुसरे ध्येय पैसे कमविणे हेही आहे, परंतु जागतिक शांततेसाठी इराणवर दबाव आणत आहेत.
दरम्यान, संघर्ष, युद्ध आणि तणावामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. सध्या ब्रेंट क्रूड ऑइल प्रति बॅरल १०० डॉलरच्या आसपास व्यापार करत आहे. एक महिन्यापूर्वी हेच दर ७५ डॉलर प्रति बॅरल होते.