इराणशी करार आता आवाक्यात; ट्रम्प यांनी दिले चर्चेतील प्रगतीचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 08:34 IST2026-05-07T08:34:03+5:302026-05-07T08:34:54+5:30
‘प्रोजेक्ट फ्रीडम’ मोहीम तात्पुरती स्थगित केल्याची घोषणा, अंतिम कराराच्या दिशेने प्रगती

इराणशी करार आता आवाक्यात; ट्रम्प यांनी दिले चर्चेतील प्रगतीचे संकेत
वॉशिंग्टन :इराणसोबत युद्ध संपवण्यासाठी चर्चेत मोठी प्रगती झाल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला, तसेच ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ ही मोहीम तात्पुरती स्थगित केली असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
परदेशी कोट्यातून डल्ला! रेल्वेचा १२१ प्रवाशांना मोठा दंड; पाहा कसा होत होता तिकिटांचा गैरवापर
‘ट्रुथ सोशल’वरील पोस्टमध्ये ट्रम्प यांनी मंगळवारी म्हटले आहे की, इराणच्या प्रतिनिधींशी अंतिम आणि सर्वसमावेशक कराराच्या दिशेने मोठी प्रगती झाली आहे. पाकिस्तानसह इतर देशांच्या विनंतीवरून आणि इराणविरोधातील लष्करी मोहिमेत मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर, तसेच कराराच्या दिशेने झालेल्या प्रगतीमुळे ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनी इराणने बंद केल्याने अडकलेल्या जहाजांना त्या मार्गाने सुरक्षितपणे प्रवास करता यावा यासाठी अमेरिकेने ही मोहीम सुरू केली होती. मात्र, होर्मुझ येथे इराणची केलेली नाकाबंदी कायम राहणार असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ या समुद्री मार्गात तणाव वाढला होता. संयुक्त अरब अमिरातीने त्यांच्या जहाजांवर इराणकडून हल्ला झाल्याचा आरोप केला.
‘सर्वसमावेशक युद्धविराम’ आवश्यक; चीनची सूचना
दोन महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या पश्चिम आशियातील युद्धाबद्दल चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली, तसेच ‘सर्वसमावेशक युद्धविराम’ आवश्यक असल्याचे इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांना बुधवारी सांगितले. बीजिंगमध्ये दोन्ही नेत्यांची भेट झाली.
अमेरिका, इस्रायलसोबत २८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या संघर्षानंतर इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांचा हा पहिलाच चीन दौरा आहे. आमच्या मते तातडीने सर्वसमावेशक युद्धविराम आवश्यक आहे. पुन्हा संघर्ष सुरू होणे योग्य नाही. चर्चेच्या माध्यमातून प्रश्नांवर तोडगा काढायला हवा, असे वांग यी यांनी अराघची यांना सांगितले.
‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ संपुष्टात आल्याची घोषणा
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ ही २८ फेब्रुवारीला सुरू केलेली कारवाई उद्दिष्टे पूर्ण झाल्यामुळे संपुष्टात आल्याचे जाहीर केले. ते म्हणाले की, आम्हाला संघर्ष वाढवायचा नाही, तर शांततेचा मार्ग हवा आहे.
राष्ट्राध्यक्षांना करार हवा आहे; पण आतापर्यंत इराणने तो मार्ग स्वीकारलेला नाही. ‘प्रोजेक्ट फ्रीडम’बाबत बोलताना त्यांनी सांगितले की, या मोहिमेचा उद्देश पर्शियन आखातात अडकलेल्या ८७ देशांतील सुमारे २३,००० नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणे हा होता.
ही आक्रमक मोहीम नाही, तर संरक्षणात्मक कारवाई आहे. आमच्यावर किंवा जहाजांवर हल्ला झाल्यासच प्रत्युत्तर दिले जाईल, असे रुबिओ यांनी स्पष्ट केले. अमेरिकेने इराणच्या काही लहान बोटी नष्ट केल्याचा दावा केला आहे. तर संयुक्त अरब अमिरातीने त्यांच्या जहाजांवर इराणकडून हल्ला झाल्याचा आरोप केला आहे.