चीनकडून इराणला आधुनिक क्षेपणास्त्रे; अमेरिका-इस्रायलविरुद्ध युद्धात होतोय वापर? जाणून घ्या सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 09:08 IST2026-03-03T08:59:50+5:302026-03-03T09:08:40+5:30
अमेरिकेने इराणविरोधात सैन्य अभियानात विमानवाहू नौकेसह अनेक नौदली जहाज इराणच्या सागरी क्षेत्राजवळ तैनात केले आहेत.

चीनकडून इराणला आधुनिक क्षेपणास्त्रे; अमेरिका-इस्रायलविरुद्ध युद्धात होतोय वापर? जाणून घ्या सत्य
बीजिंग - मध्य पूर्वेत सध्या तणावग्रस्त स्थिती आहे. अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराण सातत्याने अमेरिकेच्या वेगवेगळ्या सैन्य ठिकाणांना टार्गेट करत आहे. त्यातच इराणकडून खतरनाक क्षेपणास्त्राचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. इराणी मिसाइलने अमेरिकेची विमाने पाडली गेली आणि काही नौदलाच्या जहाजांनाही नुकसान पोहचवल्याची बातमी चिनी सरकारी मीडियात प्रसारित झाली आहे. त्यामुळे इराणकडे इतक्या आधुनिक मिसाइल चीनकडून पाठवण्यात आल्यात का असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष करून CM 302 सुपरसोनिक एंटी शिप मिसाइलबाबत ही चर्चा सुरू आहे.
काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय की, अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यापूर्वी चीन आणि इराण यांच्यात CM-302 मिसाइल विक्रीबाबत जवळपास डील निश्चित झाली होती. जर ही डील पूर्ण झाली असती तर ही अलीकडच्या काळात चीनकडून इराणला देण्यात आलेली सर्वात आधुनिक सैन्य तंत्रापैकी एक होती. मात्र चीनकडून या बातम्यांचे खंडन करण्यात आले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी अशी कुठलीही डील बातमी चुकीची आहे. चीन एक जबाबदार देश आहे आणि तो आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करतो असं त्यांनी सांगितले. या अफवांचा चीनने निषेध केला आहे. त्याशिवाय दोन्ही बाजूने तणाव कमी करण्यासाठी योग्य ती पाऊले उचलण्याचे आवाहन चीनने केले आहे.
नौदलाचे जहाज इराणजवळ तैनात
यातच अमेरिकेने इराणविरोधात सैन्य अभियानात विमानवाहू नौकेसह अनेक नौदली जहाज इराणच्या सागरी क्षेत्राजवळ तैनात केले आहेत. जर इराणकडे लांब पल्ल्याची एंटी शिप मिसाइल आहे तर ही जहाजे त्यांच्या निशाण्यावर येऊ शकतात. इराण आणि चीन यांच्यात दीर्घ काळापासून जवळचे संबंध आहेत. इराण चीनला तेल पुरवठा करणाऱ्या बड्या देशांपैकी एक आहे. त्यामुळे मध्य पूर्वेतील या परिस्थितीत चीन केवळ विधाने करण्यापुरते मर्यादित राहणार की तेहरानच्या नव्या नेतृत्वासोबत आपले संबंध मजबूत ठेवणार हे पाहणे गरजेचे आहे.
दरम्यान, अमेरिकेकडून व्हेनेझुएलाचे नेते निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीच्या अटकेनंतर आणि इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येनंतर चीनने तीव्र आक्षेप घेतला नाही. त्यातून चीन आपले संबंध संतुलित ठेवत असल्याचे दिसून येते. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प येत्या ३१ मार्च रोजी बीजिंग दौरा करणार आहेत. मात्र सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्यावरही प्रश्नचिन्ह आहेत. मात्र चीन आणि अमेरिका दोन्ही देशातील नेते एकमेकांशी संपर्कात आहेत अशी माहिती माओ निंग यांनी दिली आहे.