नेपाळमध्ये 'बालेन' पर्व! २७ मार्चला घेणार पंतप्रधानपदाची शपथ; गगन थापांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 08:54 IST2026-03-20T08:53:35+5:302026-03-20T08:54:10+5:30

येत्या २७ मार्च रोजी बालेंद्र शाह नेपाळच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

'Balen' festival in Nepal! Will take oath as Prime Minister on March 27; Gagan Thapa resigns | नेपाळमध्ये 'बालेन' पर्व! २७ मार्चला घेणार पंतप्रधानपदाची शपथ; गगन थापांचा राजीनामा

नेपाळमध्ये 'बालेन' पर्व! २७ मार्चला घेणार पंतप्रधानपदाची शपथ; गगन थापांचा राजीनामा

शेजारील देश असलेल्या नेपाळच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाने (आरएसपी) ऐतिहासिक विजय नोंदवला असून, आता देशाची धुरा तरुण आणि डॅशिंग नेते बालेंद्र शाह ऊर्फ 'बालेन' यांच्या हाती जाणार आहे. येत्या २७ मार्च रोजी बालेंद्र शाह नेपाळच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

१८२ जागांसह आरएसपीचे निर्भेळ यश

५ मार्च २०२६ रोजी पार पडलेल्या २७५ सदस्यीय प्रतिनिधी सभेच्या निवडणुकीत आरएसपीने १८२ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. या विजयामुळे नेपाळमधील जुन्या आणि प्रस्थापित पक्षांना मोठा धक्का बसला आहे. आरएसपीने निवडणुकीपूर्वीच बालेंद्र शाह यांना पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून घोषित केले होते, ज्याला मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला. पक्षाचे अध्यक्ष रवि लामिछाने, ज्येष्ठ नेते बालेंद्र शाह आणि स्वर्णिम वाग्ले यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शपथविधीचा मुहूर्त निश्चित करण्यात आला.

शपथविधीसाठी हॉल सज्ज

नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी २६ मार्च रोजी पार पडेल आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी, २७ मार्चला बालेंद्र शाह पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारतील. विशेष म्हणजे, नेपाळच्या संसदेचे नवीन भवन अद्याप पूर्णपणे तयार नसल्यामुळे हा सोहळा एका तात्पुरत्या हॉलमध्ये आयोजित केला जाणार आहे. संसद सचिवालयाचे प्रवक्ते एकराम गिरी यांनी सांगितले की, कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असून ध्वनी आणि प्रकाश व्यवस्थेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

मोठ्या नेत्यांचा पराभव, गगन थापांचा राजीनामा

या निवडणुकीत नेपाळी काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. यावेळी १०० पारची घोषणा देणाऱ्या नेपाळी काँग्रेसला केवळ ३८ जागांवर समाधान मानावे लागले. पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार गगन थापा यांचा आरएसपीच्या अमरेश सिंह यांनी पराभव केला. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत गगन थापा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याशिवाय सीपीएन-यूएमएलला २५, तर कम्युनिस्ट पार्टीला १७ जागा मिळाल्या आहेत.

राष्ट्रपतींनी मानले आभार

निवडणूक आयोगाचे कार्यवाह मुख्य आयुक्त राम प्रसाद भंडारी यांनी निवडणुकीचे अंतिम निकाल राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांना सादर केले. अत्यंत कठीण आणि गुंतागुंतीच्या परिस्थितीतही निवडणूक आयोगाने ही प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकपणे पार पाडल्याबद्दल राष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केले आहे.

Web Title : बालन शाह बनेंगे नेपाल के पीएम; गगन थापा ने दिया इस्तीफा

Web Summary : नेपाल में आरएसपी की भारी जीत, बालन शाह 27 मार्च को प्रधानमंत्री बनेंगे। नेपाली कांग्रेस की हार के बाद गगन थापा ने इस्तीफा दिया। चुनाव परिणाम नेपाली राजनीति में एक महत्वपूर्ण बदलाव दर्शाते हैं।

Web Title : Balen Shah to be Nepal's PM; Gagan Thapa Resigns

Web Summary : Nepal's RSP secured a landslide victory, paving the way for Balen Shah as Prime Minister on March 27th. Gagan Thapa resigned after Nepali Congress's defeat. The election results mark a significant shift in Nepalese politics, with new leadership emerging.

टॅग्स :Nepalनेपाळ