इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या आणखी एका मंत्र्याचा मृत्यू; अनेक गुप्तचर अधिकारीही ठार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 18:22 IST2026-03-02T18:20:36+5:302026-03-02T18:22:11+5:30
America Iran-Israel War: अमेरिका- इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध आता भीषण वळणावर येऊन पोहोचले आहे. दोन्ही बाजूंनी क्षेपणास्त्रे, रॉकेट आणि ड्रोनचा वर्षाव सुरूच आहे.

इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या आणखी एका मंत्र्याचा मृत्यू; अनेक गुप्तचर अधिकारीही ठार!
अमेरिका- इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध आता भीषण वळणावर येऊन पोहोचले आहे. दोन्ही बाजूंनी क्षेपणास्त्रे, रॉकेट आणि ड्रोनचा वर्षाव सुरूच आहे. दरम्यान, इस्रायल संरक्षण दलाने दावा केला आहे की, त्यांनी ऑपरेशन रोअरिंग लायनअंतर्गत इराणवर हल्ला केला, ज्यात त्यांच्या आणखी एका मंत्र्यासह वरिष्ठ लष्करी अधिकारी ठार झाले. या भीषण हल्ल्यानंतर आणि इस्रायलच्या दाव्यानंतर इराणकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
इस्रायली हवाई दलाने थेट तेहरानमधील इराणच्या गुप्तचर मंत्रालयाच्या मुख्यालयावर हल्ला चढवला. या अचूक हवाई हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान झाले असून इराणचे मंत्री सय्यद याह्या हमीदी, जलाल पुर हुसेन आणि इराणी रिव्होल्यूशनरी गार्डचे अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी झाले, असा दावा करण्यात आला आहे. मात्र, या कारवाईमुळे आधीच धुमसणाऱ्या मध्य पूर्वेत आता आगीत तेल ओतले गेले आहे.
सध्या इराणच्या विविध शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत असून ड्रोन हल्ल्यांचे सत्र सुरूच आहे. इस्रायलने आपल्या रोअरिंग लायन मोहिमेचा हा केवळ पहिलाच टप्पा असल्याचे म्हटले आहे, ज्यामुळे आगामी काळात हे युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला. हल्ल्याच्या पहिल्याच दिवशी इस्रायलने तेहरानमधील अयातुल्ला अली खमेनी यांच्या कंपाऊंडवर बॉम्बहल्ला केला, त्यात खमेनी ठार झाले. रविवारी रात्री इराणी माध्यमांनी खमेनी यांच्या मृत्यूची पुष्टी केली. मात्र, तेव्हापासून परिस्थिती आणखी बिकट झाली.