अफगाण हवाई दलाचा पाकिस्तानवर मोठा प्रहार, लष्करी तळावर जबरदस्त ड्रोन हल्ला! 'हमजा' उद्ध्वस्त केल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 11:22 IST2026-03-14T11:19:58+5:302026-03-14T11:22:20+5:30
या भीषण हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे कमांड सेंटर, डेपो आणि सैनिकांच्या निवास स्थाने पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून पाकिस्तानचे मोठे मानवी आणि आर्थिक नुकसान झाले आहे, असा दावा अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे.

अफगाण हवाई दलाचा पाकिस्तानवर मोठा प्रहार, लष्करी तळावर जबरदस्त ड्रोन हल्ला! 'हमजा' उद्ध्वस्त केल्याचा दावा
मध्यपूर्वेत अमेरिका-इस्रायल आणि इराण संघर्ष पेटलेला असतानाच, दुसरीकडे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणावही शिगेला पोहोचला आहे. आता अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संयंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अफगाण हवाई दलाच्या ड्रोनने इस्लामाबादेतील फैजाबाद येथील 'हमजा' या धोरणात्मक लष्करी तळावर जबरदस्त ड्रोन हल्ला केला. 'ड्युरंड रेषे'वरून सुरू असलेल्या या 'खुल्या युद्धात' आतापर्यंतची ही सर्वात मोठी लष्करी कारवाई मानली जात आहे.
या भीषण हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे कमांड सेंटर, डेपो आणि सैनिकांच्या निवास स्थाने पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून पाकिस्तानचे मोठे मानवी आणि आर्थिक नुकसान झाले आहे, असा दावा अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. खरेतर, पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील काबुल, पक्तिया आणि कंदहार येथे केलेल्या हवाई हल्ल्यांचा बदला म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.
पाकिस्तानचे 'ऑपरेशन गजब लिल हक' -
तत्पूर्वी, पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या शहरी भागांत केलेल्या बॉम्बिंगला 'ऑपरेशन गजब लिल हक' असे नाव दिले होते. याद्वारे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा पाकिस्तानने केला असला तरी, संयुक्त राष्ट्रांच्या मते यामध्ये महिला आणि मुलांसह अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला.
चीनकडून दोन्ही देशांना शांततेचे आवाहन -
या हल्ल्यानंतर इस्लामाबादमध्ये हाय-अलर्ट जारी करण्यात आला असून शहराचे प्रवेशद्वार मर्यादित करून तपासणी वाढवण्यात आली आहे. दरम्यान, वाढता तणाव पाहता चीनने दोन्ही देशांना शांततेचे आवाहन केले आहे. एवढेच नाही तर, चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी अफगाण नेत्यांशी संवाद साधून सैन्य माघारी घेण्याचा आग्रहही धरला आहे.
در ادامهٔ عملیاتهای انتقامی «ردالظلم»
— د ملي دفاع وزارت - وزارت دفاع ملی (@MoDAfghanistan2) March 13, 2026
نیروهای هوایی افغانستان، امروز(حوالی ساعت ۵ بعدازظهر)، یک مرکز مهم نظامی رژیم نظامی پاکستان به نام «حمزه» را در منطقهٔ فیضآباد اسلامآباد هدف قرار دادند... pic.twitter.com/fhYJv6fFVH
का पेटलं पाकिस्तान आणि अफगाणिस्तान युद्ध -
खरेतर, २६०० किलोमीटर लांबीच्या 'ड्युरंड रेषे'वरून दोन्ही देशांमध्ये वाद पेटला आहे. या रेषेला अफगाणिस्तान मान्यता देत नाही. याशिवाय, अफगाणिस्तान 'TTP' (तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान) सारख्या दहशतवादी संघटनेला आश्रय देत असल्याच आरोपही पाकिस्तानकडून केला जात आहे. तर अफगाणिस्तान याला आपल्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन असल्याचे म्हणत आहे.