संतापजनक! हदगावमध्ये नशेत धुंद कारचालकाने तिघांना चिरडले, माय-लेकासह बहीण जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 11:52 IST2026-04-23T11:51:04+5:302026-04-23T11:52:03+5:30
वाढदिवसाचा आनंद ठरला अखेरचा! समोरून येणाऱ्या कारने दुचाकीला उडवले; अंबाळा येथील नरवाडे कुटुंबावर काळाचा घाला.

संतापजनक! हदगावमध्ये नशेत धुंद कारचालकाने तिघांना चिरडले, माय-लेकासह बहीण जागीच ठार
हदगाव (जि. नांदेड): तालुक्यातील हडसणी फाट्याजवळ बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नातेवाईकाच्या मुलाचा वाढदिवस साजरा करून दुचाकीने परतत असताना समोरून येणाऱ्या भरधाव कारने (MH-12 KN-9149) त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत रेखाबाई भाऊराव नरवाडे, यशवंत भाऊराव नरवाडे आणि त्यांची बहीण अनुसया लोणारे (४०) यांचा जागीच मृत्यू झाला.
नशेत धुंद कारचालकाचा थरार
प्राप्त माहितीनुसार, कारमधील सर्व प्रवासी नशेत होते. उमरखेडहून हदगावकडे येत असताना या कारने वाटेतही एका दुचाकीला धडक दिली होती. त्यानंतर हडसणी फाट्याजवळ नरवाडे कुटुंबाच्या दुचाकीला (MH-26 BU-2509) उडवले. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. मृतांना हदगावच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
पोलिसांची तत्परता
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना तातडीने मदत करत रुग्णालयात हलवले आणि उमरखेड येथील संबंधित कारचालक व त्याच्या साथीदारांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली. अंबाळा येथील हॉटेल चालक भाऊराव नरवाडे यांचे हे कुटुंब असून, या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.