वसमतच्या मातीत 'बंगळुरू पॅटर्न'; साडेतीन वर्षांत फुलली नारळाची बाग, आंतरपीक आंब्यातूनही उत्पन्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 14:24 IST2026-05-05T14:20:05+5:302026-05-05T14:24:12+5:30
पारंपरिक शेतीला फाटा! हिंगोलीच्या शेतकऱ्याने बंगळुरूवरून आणली नारळाची रोपे

वसमतच्या मातीत 'बंगळुरू पॅटर्न'; साडेतीन वर्षांत फुलली नारळाची बाग, आंतरपीक आंब्यातूनही उत्पन्न
- इस्माईल जहागीरदार
वसमत (जि. हिंगोली) : हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा (ता. वसमत) येथील प्रगतिशील शेतकरी मनोज साहेबराव इंगोले यांनी कर्नाटकच्या धर्तीवर आपल्या ६ एकर शेतात नारळ आणि आंबा शेतीचा प्रयोग साकारला आहे. केवळ साडेतीन वर्षांत नारळाच्या झाडांना फुलोरा येऊ लागल्याने परिसरात या प्रयोगाची मोठी चर्चा होत आहे.
मनोज इंगोले यांनी कर्नाटक राज्यातील बंगळुरू येथील नारळ शेतीला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील तंत्रज्ञान समजून घेतले. त्यानंतर त्यांनी थेट बंगळुरूवरून नारळाची १ हजार उच्च दर्जाची रोपे आणली. आपल्या ६ एकर शेतात १५ ते २० फूट अंतरावर रोपांची शास्त्रोक्त पद्धतीने लागवड केली. झाडांची योग्य निगा, दर आठ दिवसांनी पाणी आणि बंगळुरूच्या धर्तीवर खत व्यवस्थापन केल्यामुळे ही झाडे आज डौलाने उभी आहेत.
नारळात आंब्याचे आंतरपीक
केवळ नारळावर अवलंबून न राहता इंगोले यांनी आंतरपीक म्हणून त्याच बागेत केशर आणि दशहरी जातीच्या आंब्याची ८६५ रोपे लावली आहेत. विशेष म्हणजे, अवघ्या दोन वर्षांतच आंब्याला फळधारणा सुरू झाली, तर आता साडेतीन वर्षांनंतर नारळालाही फुलोरा (कणसे) येऊ लागल्याने शेतकऱ्याच्या कष्टाला फळ मिळाले आहे..
शासकीय अनुदानाची प्रतीक्षा आणि नाराजी
एकीकडे निसर्गाशी झुंज देत शेतकरी नवनवीन प्रयोग करत असताना, दुसरीकडे शासन आणि कृषी विभागाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची भावना व्यक्त होत आहे. कृषी विभागाने अशा फळबागांसाठी तांत्रिक मार्गदर्शन केल्यास अधिक फायदा होईल. लागवडीसाठी शासनाकडून मिळणारे अनुदान वेळेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. संबंधित विभागाने कागदपत्रांची पूर्तता करून सहकार्य करावे, अशी मागणी केली जात आहे.
अनुदानासाठी चकरा मारायला लावू नये
मी बंगळुरूवरून रोपे आणून जिद्दीने ही बाग फुलवली आहे. साडेतीन वर्षांत नारळाला फुलोरा आल्याने समाधानी आहे. भविष्यात यातून चांगले उत्पन्न मिळेल, अशी आशा आहे. मात्र, शासनाने आम्हा शेतकऱ्यांना अनुदानासाठी चकरा मारायला लावू नये. वेळेवर मदत आणि मार्गदर्शन मिळाल्यास वसमतचा शेतकरी नक्कीच प्रगती करील.
-मनोज साहेबराव इंगोले, प्रगतिशील शेतकरी, कुरुंदा