दातांनी नखं का कुरतडू नयेत?; कितीतरी मोठ्या आजारांना आपण स्वत:हून आमंत्रण देतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 10:02 IST2026-05-02T10:02:10+5:302026-05-02T10:02:31+5:30

नखं कुरतडण्याची सवय साधी नाही, नखं दातांनी कुरतडणं आधी थांबवा!

Why shouldn't bite our nails with our teeth?; We are inviting many major diseases ourselves | दातांनी नखं का कुरतडू नयेत?; कितीतरी मोठ्या आजारांना आपण स्वत:हून आमंत्रण देतोय

दातांनी नखं का कुरतडू नयेत?; कितीतरी मोठ्या आजारांना आपण स्वत:हून आमंत्रण देतोय

चिराग आज एकदमच गळून गेला होता. उलट्या आणि जुलाबांमुळे त्याला चांगलाच अशक्तपणा आला होता. चालण्याचेही त्राण नव्हते. तपासण्यासाठी त्याला टेबलवर बोलवलं आणि माझं लक्ष त्याच्या खुरट्या झालेल्या नखांकडे गेलं... नेलकटरने अशी नखं कापली जाणंच शक्य नाही, त्यामुळे ते चिरागच्या दातांचंच काम आहे हे माझ्या लक्षात आलं.

‘चिराग तू नखं खातोस ना?’ मी विचारलं तर चपापलेला चिराग ‘नाही नाही डॉक्टरकाकू’ म्हणाला पण तोपर्यंत त्याची आई पुढे आली. म्हणाली, ‘हो मॅडम, त्याला खूप सवय आहे नखं खायची... कितीही ओरडले तरी तो ऐकत नाही. मला आठवतच नाही मी नेलकटरने त्याची नखं कधी काढली होती... कायम अशीच असतात’ चिरागला रागावून उपयोग होणार नव्हता, त्याला समजवायलाच लागणार आहे, हे लक्षात आलं.

मी : चिराग अरे आपण आपल्या हातांनी किती कामं करतो... तू शाळेत जातोस, बसमध्ये चढायला हातांचा आधार लागतो. क्रिकेट, फुटबॉल खेळताना हात वापरला जातो. टॉयलेटमध्ये आपण हात वापरतो. सगळ्या मुलांबरोबर खेळताना, ग्राउंडची माती, रस्त्यांवरची धूळ, टॉयलेटमधली घाण हे सगळं आपल्या हातांना लागतं. त्यात सूक्ष्म जंतू असतात. हात धुतले तरी हे जंतू आपल्या नखांमध्ये जाऊन बसतात. नखांमध्ये जाऊन साबण त्यांना घालवत नाही. मग तीच नखं तू तोंडात घातल्यावर त्यातली माती आणि जंतू तुझ्या पोटात जाणार आणि तिथे हातपाय पसरून बसणार... मग आपल्या आतड्यांना इजा होते आणि टायफॉईड, गॅस्ट्रो सारखे आजार होतात. तू खाल्ल्यामुळे पोटात गेलेली नखं असतात ना, ती चांगली टोकदार असतात. ती पोटात, आतड्यांमध्ये रुतून बसतात. 
आतड्यांना सूज येते आणि आपल्या पोटात दुखत राहातं...

नखं खाल्ल्यामुळे जंत होतात. ते जंत रात्री शीच्या जागेतून बाहेर येतात. तिथे अंडी घालतात. मग खूप खाज येते. मग ती अंडी परत नखांमध्ये आणि नखं खाल्ली की पोटात... असं चक्र सुरु होतं. हे असं झालं की आपल्याला अशक्तपणा येतो... आता तूच सांग, ही किती वाईट सवय आहे?  हे सगळं ऐकून चिराग विचारात पडला होता. मी सांगितलेलं सगळं त्याच्या आईलाही माहिती नव्हतं त्यामुळे तीही ऐकत होती. चिरागला आणखी चार समजुतीच्या गोष्टी सांगितल्या. नखं खाणार नाही हे प्रॉमिस घेतलं त्याच्याकडून आणि औषधं देऊन त्याला घरी पाठवून दिलं. चिरागची ही गोष्ट तुम्हाला ओळखीची वाटली की अनोळखी? नक्कीच ओळखीची वाटलेली असणार. खरंतर नखं खाणारा चिराग हा एकटा नाही. त्याच्यासारखी अनेक मुलं आहेत. जाणता-अजाणता नखं खाण्याची सवय जडते. पण या सवयीचे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम चिरागप्रमाणे इतरांनीही समजून घेतले तर ही सवय प्रयत्नपूर्वक कमीही होवू शकते. अर्थात त्यासाठी  'मी वाढलेली नखं नेलकटरनेच कापणार,  नखं खाणार नाही' हे प्रामिस आई बाबांसोबत स्वत:लाही द्यावं लागणार आहे. चिरागने तर हे प्राॅमिस केलंय .. तुम्हीही हे प्राॅमिस करताय ना मग?
- डॉ. कल्पना सांगळे,
बालरोगतज्ज्ञ, पुणे

kalpana_sangale@yahoo.co.in

Web Title: Why shouldn't bite our nails with our teeth?; We are inviting many major diseases ourselves