शरीर प्रमाणापेक्षा जास्त तापतंय याचे काही मुख्य संकेत, पाहा बॉडी ओव्हरहीट दूर करण्यासाठी काय कराल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 11:03 IST2026-04-30T11:02:57+5:302026-04-30T11:03:32+5:30
Signs Of Body is Overheating : शरीर ओव्हरहीट होत असेल तर शरीर काही संकेत देतं, जे ओळखून आपण वेळीच आराम मिळवू शकता.

शरीर प्रमाणापेक्षा जास्त तापतंय याचे काही मुख्य संकेत, पाहा बॉडी ओव्हरहीट दूर करण्यासाठी काय कराल
Signs Of Body is Overheating : दिवसेंदिवस वाढत चाललेला उन्हाचा पारा वेगवेगळ्या समस्यांचा कारण बनतोय. जास्तवेळ उन्हात राहिल्याने किंवा शरीराला पुरेसं पाणी न मिळाल्याने शरीराचं तापमान वाढतं म्हणजे शरीर ओव्हरहीट होतं. ज्यामुळे आपल्याला हीट स्ट्रोक किंवा इतरही अनेक समस्या होऊ शकतात. पण अनेकदा लोक या गोष्टींकडे दुर्लक्ष करताना दिसतात. शरीर जर ओव्हरहीट होत असेल, तर याची वेळीच ओळख पटवणं फार महत्वाचं ठरतं. जेणेकरून योग्य ते उपाय करता येतील. शरीर ओव्हरहीट होत असेल तर शरीर काही संकेत देतं, जे ओळखून आपण वेळीच आराम मिळवू शकता.
जर आपण या शरीर ओव्हरहीट होणाऱ्या संकेतांकडे दुर्लक्ष केलं तर याचे परिणाम गंभीर होऊ शकतात. अशात हे संकेत काय असतात हे आपण पाहणार आहोत, जेणेकरून योग्य ते उपाय करता येतील.
शरीर ओव्हरहीट होण्याचे संकेत
जास्त घाम
शरीराचं तापमान वाढल्यावर घाम येणं ही एक सामान्य बाब आहे. पण जर नेहमीपेक्षा जास्त घाम येत असेल तर समजा की, शरीर ओव्हरहीट होत आहे.
डोकेदुखी आणि चक्कर
उन्हाळ्यात डोकं जड होणे आणि चक्कर येणे हे शरीराच्या हीट स्ट्रेसची लक्षणं आहेत. जर असं होत असेल तर उन्हात जाणं टाळा आणि शरीर थंड ठेवण्यासाठी आराम करा.
त्वचा लाल किंवा गरम होणे
त्वचा जर लाल दिसत असेल, लाल चट्टे आले असतील किंवा त्वचेची जळजळ होत असेल तर शरीर उष्णतेमुळे प्रभावित होत आहे असं समजा. वेळीच एक्सपर्टचा सल्ला घ्या आणि योग्य ते उपाय करा.
थकवा आणि कमजोरी
जास्त तापमानामुळे ओव्हरहीट झालेल्याला शरीरात लवकर थकवा येतो आणि स्नायूंमध्ये कमजोरी जाणवते. अशात भरपूर पाणी प्या आणि आराम करा.
मळमळ किंवा उलटी
ऊन लागलं असेल किंवा शरीर ओव्हरहीट झालं असेल तर मळमळ होऊ लागते आणि उलटीही होऊ शकते. अशात हेल्थ एक्सपर्टचा सल्ला घेऊन योग्य तो उपाय करा.
काय उपाय कराल?
- हळूहळू थंडगार नव्हे तर साधं किंवा गारसर पाणी प्या. शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते.
- मान, कपाळ, बगल, मनगट यावर ओल्या कापडाची पट्टी ठेवा. यामुळे तापमान कमी होण्यास मदत होते.
- घट्ट, जाड किंवा गरम कपडे सैल करा. हलके आणि सैल कपडे घाला.
- धावपळ, व्यायाम किंवा मेहनतीचं काम लगेच थांबवा. शांत बसून शरीराला विश्रांती द्या.
- घाम जास्त आला असेल तर ORS किंवा इलेक्ट्रोलाइट पेय उपयोगी ठरू शकते.