जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 14:20 IST2026-04-30T14:18:08+5:302026-04-30T14:20:19+5:30
'राजा शिवाजी'साठी निर्माती जिनिलिया देशमुखने घेतली मेहनत

जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
'राजा शिवाजी' हा बहुप्रतिक्षित सिनेमा उद्या १ मे रोजी महाराष्ट्र दिनी रिलीज होत आहे. रितेश देशमुखने सिनेमात काम तर केलंच आहे शिवाय लेखन आणि दिग्दर्शनही केलं आहे. या प्रवासात रितेशला पत्नी जिनिलियाची उत्तम साथ लाभली. जिनिलियाने सिनेमाची निर्मिती केली आहे. सिनेमाच्या निर्मितीचा आणि एवढ्या मोठ्या स्केलवर सिनेमा साकारण्याचा अनुभव जिनिलियाने शेअर केला आहे.
'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत जिनिलिया म्हणाली, "निर्मितीमागे कुठेही तडजोड करायची नाही हा मी प्रयत्न केलाच. छत्रपती हे अँथम साँग आहे ते मोठ्या स्केलवर करायचं हे मी आधीपासूनच ठरवलं होतं. या गाण्यासाठी रितेशने दोन दिवसांचं शूट ठेवलं पण मी त्याला तीन दिवस दिले. कारण मला वाटलं की हे गाणं सर्वांच्या मनाला भिडणारं आहे. बजेटमध्ये राहण्यासाठी मला इतर सीन कमी करावे लागणार होते. म्हणून मी ते सीन्स अर्ध्या दिवसातच केले. पण या गाण्याला पूर्ण तीन दिवस दिले. कारण हे गाणं सिनेमाची ओळख बनेल असं मला हवं होतं. स्केल मोठा दिसायला हवा हाच माझा यामागचा विचार होता. मी माझ्या परीने सर्व प्रयत्न केले. कधी कधी काय होतं की तुम्हाला सिनेमा बनवायचा असतो पण काही कारणाने तो होत नाही. मग आता जर तुम्हाला संधी मिळतेय तर तुम्ही त्याची किंमत केली पाहिजे. गृहित धरता कामा नये. पूर्ण एनर्जीने तुम्ही काम करायला हवं."
ती पुढे म्हणाली, "माझी संपूर्ण प्रोडक्शन टीम खूप चांगली होती. सगळेच टीम प्लेयर्स होते. आम्ही रोज सकाळी साडेचार वाजता काम करायला सुरुवात करायचो. टीममधला एकही जण कधी उशिरा आला नाही. रितेश तर पहाटे ४ लाच हजर असायचा. जेव्हा सगळे मिळून म्हणतात की 'चला हा सिनेमा करायचा आहे'- हेच तर आपल्याला हवं असतं. रितेश मला नेहमी म्हणतो की सिनेमाचा रिझल्ट काय असेल ते आपल्याला माहित नाही. पण हा जो प्रवास आहे तो महत्वाचा आहे. याच आठवणी तुम्ही पुढे घेऊन जाणार आहात. मला वाटतं हा सिनेमा आमच्यासाठी एक भावनाच आहे. त्यामुळे सगळी टीम याबद्दल सकारात्मक असणं महत्वाचं आहे. एखाद्या व्यक्तीलाही असं वाटलं की नाही यार, हे नाही करायचं. तर ते होत नाही. मला वाटतं की प्रत्येकाने त्याच भावनेने काम करणं गरजेचं आहे. निर्माती म्हणून मी हे काम करु शकतेय हे माझं भाग्यच आहे."
सिनेमाची निर्मिती मुंबई फिल्म कंपनीच्या जिनिलिया देशमुख आणि जिओ स्टुडिओजच्या ज्योती देशपांडे यांनी केली. याबद्दल रितेश म्हणाला, "मी नेहमी हेच सांगतो की या दोघी सिनेमाच्या मागच्या स्त्री शक्ती आहे. कधी कधी असं वाटतं की स्त्री जे धाडस करू शकते ते पुरुषही करू शकत नाहीत. या सिनेमाच्या मागे उभं राहायचं आणि इतक्या मोठ्या स्केलवर सिनेमा बनवायचं धाडस ज्योती देशपांडेंनी केलं. तर दुसरीकडे ग्राउंडवर येत विटावर वीट उभी करायचं काम जिनिलिया यांनी केलं. बजेटमध्ये राहून मोठा सिनेमा उभा करायचा हे काम सोपं नाही."