The work of Dhapewada Phase-2 is Slow Work | धापेवाडा टप्पा-२ चे काम कासवगतीने
धापेवाडा टप्पा-२ चे काम कासवगतीने

ठळक मुद्देपाईप तयार करण्याचा प्लांट बंद अवस्थेत : चोरखमारा, बोदलकसा, तलावात पाणी सोडा

लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : शेतीसाठी पाणी आवश्यक आहे.धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा -१ पूर्ण झाली असून टप्पा-२ चे काम मात्र अत्यंत कासवगतीने सुरू आहे. मेंढा येथील पाईप तयार करण्याचा प्लांट कित्येक दिवसापासून बंद आहे. चोरखमारा, बोदलकसा तलावात पाणी लवकरात लवकर सोडल्यास शेतकऱ्यांना पाणी मिळेल. तसेच पिके घेण्यास मदत होईल. परंतु कामाची स्थिती पाहून शेतकरी चिंतीत आहे.
चोरखमारा व बोदलकसा तलावात पाणी सोडण्यासाठी कित्येक दिवसांपासून रस्त्याच्या कडेला काही ठिकाणी पाईप टाकून ठेवण्यात आले आहेत. तर मेंढा येथील प्लांटवर पाईप बनविण्यासाठी लागणाऱ्या लोखंडी प्लेटा रस्त्याच्या कडेलाच ठेवण्यात आल्या आहेत. काम बंद असल्याने त्या तशाच पडून आहेत. हे प्लांट कधी चालू होणार याची चौकशी केली असता पुढील महिन्यात सुरु होईल, असे तेथील चौकीदार आणि कामगाराने सांगितले. धापेवाडा टप्पा-२ करिता ९१७.०३ कोटी रुपये प्रशासकीय मान्यता मिळाली असून ६११.५० कोटी रुपये खर्च झाले आहेत.
बॅरेज हा ४१३ मिटर लांब, २३ दरवाजे असलेल्या ४४.०५ दलघमी (१.५६ टीएमसी) क्षमतेचे बॅरेजचे काम पूर्ण झाले. यामुळे भंडारा आणि गोंदिया जिल्हा जोडल्या गेला. कवलेवाडा पंपगृहावर ८ पंपाद्वारे पाणी उपसा करुन बोदलकसा व चोरखमारा तलावात सोडण्यात येणार आहे.बोदलकसाकरीता १९.८० कि.मी.लांबीच्या २००० मी.मी. व्यासाच्या पाईप लाईन टाकण्यात येणार आहे. चोरखमारा तलावासाठी १९.९३ कि.मी.,१६०० मि.मी.व्यासाची पाईपची एक रांग टाकण्यात येईल.
बोदलकसा पंपगृहातून ४ पंपाद्वारे पाणी उपसा करुन मंगेझरी येथील वितरण कुंडात सोडण्यात येईल.हे ५.१० कि.मी. लांबीच्या १७५० मी.मी.व्यासाच्या पाईपच्या दोन लाईन टाकण्यात येणार आहे.
मंगेझरी वितरण कुंडातून डाव्या बाजूला गुमडोह, पांगडी, पिंडकेपार तलावात पाणी सोडण्यात येईल. उजव्या बाजूला कटंगी, रेंगेपार, बंदरचुहा, चुलबंद, उमरझरी, कन्हारपायली व नवेगावबांध या तलावात पाणी सोडण्यात येईल. टप्पा-२ मुळे २३४ गावांना लाभ मिळणार आहे. तिरोडा, गोरेगाव, सडक अर्जुनी, साकोली, लाखांदूर तालुक्यातील गावांना फायदा मिळणार असल्याने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शक्य तेवढ्या लवकर होणे गरजेचे आहे. याकडे वरिष्ठ अधिकारी व जनप्रतिनिधी यांनी लक्ष घालून कामाला गती देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.

Web Title: The work of Dhapewada Phase-2 is Slow Work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.