Vegetable vendor struggling for a plastic ban | प्लास्टीक बंदीसाठी झगडणारा भाजी विक्रेता
प्लास्टीक बंदीसाठी झगडणारा भाजी विक्रेता

ठळक मुद्देअभिनव उपक्रम, कागदाच्या पिशव्यांचा वापर

दिलीप चव्हाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : छंद, जिद्द आणि चिकाटी या तीन गोष्टी एकत्र आल्या तर कोणतेही मिशन फतेह झाल्याशिवाय राहत नाही. अशाच एका तरुणाची निसर्गाप्रती आवड व जवाबदारीने एक अनोखा उपक्रम सुरु केला आहे. नागरिकांकडून प्लास्टीकचा वापर दिवसेंदिवस वाढत असताना त्यावर नियंत्रण कसे मिळविता येईल. याविषयी मार्गदर्शन स्वत:च्या भाजीपाला विक्रीच्या दुकानातून गोरेगाव येथील एक भाजी विक्रेता करीत आहे.
संजय घासले असे त्या भाजी विक्रेत्याचे नाव आहे.निसर्गाच्या सान्निध्यात राहणारा उच्च शिक्षीत तरुणाने वयाच्या तीशीत अनेक जंगले पालथी घालत असतांना या तरुणाने जंगलातील विविध प्रजातीच्या वनस्पतीच्या अभ्यास केला.
विविध रोगांवर काम करणारी औषधी, आंबाडी शरबत, बेलाचे शरबत, मोहाचे शरबत, मोहा पावडर, टोमॅटो पावडर, जामुन शिरखा, कापडी पिशवी, जामुन सिरखा, पेपर बॅग, भुईनिम, कस्तुरी पावडर, मुगना पावडर, मोहा बिस्कीट तयार करुन त्याविषयी महिला बचत गटांना प्रशिक्षण दिले. प्लास्टीकचा वापर करण्याचे काय-काय दुष्परिणाम आहे.
याविषयी वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडियाच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण दिले. गावागावातील महिलांना प्रशिक्षण दिल्यावर वनउपोजातील पदार्थ तयार होत गेले. पुढे शहरी भागात त्यांची विक्री व्हावी म्हणून निसर्ग स्टोर्सची स्थापना केली. आजघडीला निसर्ग स्टोर्समुळे नैसर्गीक खाद्य पदार्थ शहरी भागात येत आहे. त्या पदार्थाची मागणीही दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ग्रामीण क्षेत्रातील महिलांना निसर्गप्रेमी संजय घासलेमुळे रोजगार मिळत आहे.
घासले यांनी निसर्ग स्टोर्स व सोबतच भाजीपाला विक्रीचे दुकान थाटले आहे. त्याच्या दुकानात गेल्यावर कुठेही प्लास्टीकचा वापर होताना दिसत नाही. दुकानाच्या अग्रभागी प्लास्टीक वापरु नका, पर्यावरण वाचवा असा संदेश लिहिलेला दिसतो. प्लास्टीकमुळे कसे दुष्परिणाम होतात.
याविषयी सखोल माहिती दुकानात आलेल्या ग्राहकांना देणे, असा संजयचा नित्यक्रम आहे. चांगले विचार, चांगले संस्कार, पर्यावरणाविषयी आवड आणि संवर्धन यासाठी घासले यांनी स्वत:चे आयुष्य वाहून घेतले आहे.

प्लास्टीक बंदी कागदावरच
गोरेगाव नगरपंचायतच्या हद्दीत आजही पाहिजे त्या प्रमाणावर प्लास्टीक बंदी झाली नाही. नगरपंचायतीने प्लास्टीक बंदी केली असली तरी काही प्रमाणात प्लास्टीकचा वापर होताना दिसतो. त्यावर कायम अंकुश लागावे अशी संजय घासले यांनी सांगितले.

Web Title: Vegetable vendor struggling for a plastic ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.