On the bank account without having to lift the cylinder | सिलिंडरची उचल न करताच अनुदान बँक खात्यावर
सिलिंडरची उचल न करताच अनुदान बँक खात्यावर

ठळक मुद्देग्राहकाची पोलीस व जिल्हा पुरवठा विभागाकडे तक्रार। गॅस सिलिंडरची परस्पर विक्री होत असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नियमानुसार ग्राहकांनी एजन्सीकडे गॅस सिलिंडरची बुकींग करुन उचल केल्यानंतर संबंधित ग्राहकाच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा केली जाते. मात्र ग्राहकांनी गॅस सिलिंडरची बुकींग केल्यानंतर त्याची उचल केली नसताना सुध्दा त्याच्या बँक खात्यावर अनुदान जमा झाले. हा प्रकार तिरोडा येथे उघडकीस आला. त्यामुळे ग्राहकाने बुकींग केलेल्या गॅस सिलिंडरची परस्पर विक्री केली जात असल्याची पोलीस स्टेशन आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे केली आहे.
प्राप्त माहितीनुसार तिरोडा येथील संत सजन वार्ड रहिवासी दिलीप रामकृष्ण लिल्हारे यांची पत्नी देवीका लिल्हारे यांच्या नावावे गॅस सिलिंडर आहे. त्यांचा ग्राहक क्रमांक ४०४८५३ हा आहे. त्यांनी ४ आॅक्टोबरला तिरोडा येथील गॅस एजन्सीकडे गॅस सिलिंडरची बुकींग केली. मात्र त्यांनी गॅस सिलिंडरची उचल केली नाही. मात्र त्यांच्या बँक खात्यावर गॅस सिलिंडरच्या अनुदानाची रक्कम जमा झाली.त्यामुळे लिल्हारे यांना सुध्दा धक्का बसला. आपण गॅस सिलिंडरची उचल केली नसताना अनुदान आपल्या बँक खात्यावर जमा कसे झाले याची चौकशी केली. दरम्यान त्यांच्या नावाच्या गॅस सिलिंडरची दुसºयाला विक्री करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.
विशेष म्हणजे यापूर्वी २०१७ मध्ये सुध्दा लिल्हारे यांच्या खात्यावर गॅस सिलिंडरची उचल न करताना तीनदा अनुदानाची रक्कम जमा झाली होती. गॅस एजन्सी चालकाकडून ग्राहकाने बुक केलेल्या गॅस सिलिंडरची दुसºयाला विक्री केली जात असून यात काळाबाजार होत असल्याची लेखी तक्रार लिल्हारे यांनी तिरोडा पोलीस स्टेशन आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे केली. मात्र संबंधित विभागाने अद्यापही याची चौकशी केली नाही. त्यामुळे आता विभागीय आयुक्तांकडे तक्रार करुन यातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी लिल्हारे यांनी केली आहे.

Web Title: On the bank account without having to lift the cylinder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.