लईराई जत्रेसाठी सज्जता: मुख्यमंत्री सावंत; सुरक्षेला प्राधान्य, मॉक ड्रिलद्वारे अधिकाऱ्यांचे प्रात्यक्षिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 10:49 IST2026-04-19T10:48:59+5:302026-04-19T10:49:16+5:30
शनिवारी रात्री मॉक ड्रिल आयोजित केले होते.

लईराई जत्रेसाठी सज्जता: मुख्यमंत्री सावंत; सुरक्षेला प्राधान्य, मॉक ड्रिलद्वारे अधिकाऱ्यांचे प्रात्यक्षिक
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: शिरगाव येथील लईराई देवीच्या जत्रोत्सवानिमित्त राज्य प्रशासनाने व्यापक तयारी केली असून प्रत्येक भाविकाची सुरक्षा ही प्रशासनाची पूर्ण जबाबदारी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. यावेळी आमदार प्रेमेंद्र शेट, तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शनिवारी रात्री मॉक ड्रिल आयोजित केले होते. या बैठकीत पोलिस दल, अग्निशामक दल, आरोग्य विभाग, वाहतूक विभाग तसेच विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी, देवस्थान पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वांना मार्गदर्शन करताना कोणत्याही अधिकाऱ्याने आपली जबाबदारी झटकू नये, तर एकत्रितपणे कार्य करून जत्रोत्सव निर्विघ्न पार पाडावा, असे स्पष्ट निर्देश दिले.
गेल्या वर्षी घडलेल्या दुर्दैवी घटनेचा संदर्भ देत त्यांनी यंदा विशेष दक्षता घेण्याचे आदेश दिले. गर्दी होणाऱ्या ठिकाणी विशेष लक्ष ठेवणे, संशयास्पद हालचालींवर तत्काळ कारवाई करणे, तसेच वाहतूक आणि सुरक्षेची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
सुमारे ९०० पोलिस तैनात
सुमारे ९०० पोलिस कर्मचारी आणि विविध विभागांचे अधिकारी, पोलिसांची पथके, आरोग्य सेवा, अग्निशामक दल या व्यवस्थेत सहभागी असून मागील सहा ते आठ महिन्यांपासून तयारी सुरू होती. आता ही तयारी अंतिम टप्प्यात आली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी कंट्रोल रूमला भेट देऊन सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर यंत्रणांची पाहणी केली. विशेषतः होमकुंड परिसरात रात्रीच्यावेळी कडक सुरक्षा, तसेच काही वेळेसाठी वाहतूक नियंत्रण लागू करण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीला जिल्हाधिकारी अंकित यादव, पोलिस अधीक्षक हरीश मडकईकर, गुरुदास देसाई, शुभम नाईक, शैलेंद्र देसाई, पोलिस उपअधीक्षक श्रीदेवी वाहतूक ट्राफिक सेल, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सर्व विभागांनी समन्वयाने काम करून जत्रोत्सव यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक खात्याच्या तयारीचा आढावा घेतला व सूचना केल्या. अंकित यादव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अधिकाऱ्यांनी मॉकड्रिलमध्ये सहभाग घेताना सुरक्षा व्यवस्था वाहतूक आरोग्य सेवा, अग्निशामक दलाने सुरक्षेबाबत प्रात्यक्षिके सादर केली.