गौतम खट्टरच्या शोधात पोलिस डेहराडूनमध्ये; तपास गुन्हे शाखेकडे हस्तांतरित, तक्रारींचा ओघ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 08:07 IST2026-04-22T08:06:38+5:302026-04-22T08:07:05+5:30
खट्टर यांच्या डेहराडून येथील निवासस्थानी गोवा पोलिसांचे पथक पोहोचले.

गौतम खट्टरच्या शोधात पोलिस डेहराडूनमध्ये; तपास गुन्हे शाखेकडे हस्तांतरित, तक्रारींचा ओघ
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: वास्को येथे आयोजित एका कार्यक्रमात सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक टिप्पणी केल्याप्रकरणी गौतम खट्टर यांच्याविरुद्धचा तपास आता गुन्हे शाखेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस महानिरीक्षक वेदप्रकाश सूर्या यांनी मंगळवारी हा तपास वास्को पोलिसांकडून काढून गुन्हे शाखेकडे सोपवण्याचे आदेश दिले.
दरम्यान, खट्टर यांच्या डेहराडून येथील निवासस्थानी गोवा पोलिसांचे पथक पोहोचले. पोलिसांनी घराची झडती घेत परिसरातही चौकशी केली. मात्र, खट्टर तेथे आढळला नाही. या कारवाईदरम्यान डेहराडून पोलिसांनीही गोवा पोलिसांना सहकार्य केले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खट्टरविरोधात लवकरच लूकआउट नोटीस जारी करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. तर गुन्हे शाखेचे अधीक्षक राहुल गुप्ता यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, या संवेदनशील प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. ही पथके खट्टर यांच्या शोधार्थ विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. वास्को पोलिसांनी आतापर्यंत जमा केलेली सर्व कागदपत्रे आणि पुरावे गुन्हे शाखेला सुपुर्द करण्याची प्रक्रिया मंगळवारी तातडीने पूर्ण करण्यात आली.
संशयिताचा शोध घेण्यासाठी वास्को पोलिसांचे एक पथक आधीच दिल्लीला रवाना झाले होते. आता गुन्हे शाखेची पथके तांत्रिक माहिती आणि गुप्तहेरांच्या मदतीने त्यांचा शोध घेत आहेत. आक्षेपार्ह टिप्पणीमुळे धार्मिक सौहार्द धोक्यात येऊ शकते, अशी भीती व्यक्त करत लोकांत खदखद वाढली.
दरम्यान, खट्टर यांनी केलेल्या विधानामुळे ख्रिस्ती धर्मीयांसह सर्वसामान्य नागरिकांच्या भावना तीव्र दुखावल्या आहेत. या विधानाचा निषेध करण्यासाठी आणि खट्टर यांच्यावर कारवाई करण्यासाठी तक्रारदारांचा ओघ सुरूच आहे.
सोमवारी सहा नव्या तक्रारी दाखल झाल्या होत्या, तर मंगळवारी आणखी दोन तक्रारींची भर पडली. तर कॅथोलिक असोसिएशन ऑफ गोवाने वास्को पोलिस स्थानकात पुरवणी तक्रार दाखल करून मंत्री माविन गुदिन्हो यांच्या अटकेची मागणी केली.
लोकांच्या भावना दुखवू नका : मुख्यमंत्री
डिचोली : 'सलोखा, सर्वधर्मसमभाव हा गोव्याचा आदर्श आहे. धार्मिक सलोखा कोणत्याही परिस्थितीत बिघडणार नाही, याची काळजी प्रत्येक कार्यक्रमात घेणे हे आयोजक व वक्त्त्यांचे कर्तव्य आहे', असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. ते म्हणाले की, 'बोलताना प्रत्येकाने मर्यादा ठेवून बोलणे गरजेचे आहे. लोकांच्या भावांना दुखावण्याचा प्रयत्न करू नये.'